औरंगाबाद : सोमवारी दुपारच्या सत्रात घेण्यात आलेल्या एमए मराठी अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकेत अशुद्ध लेखनाचा कळस होता. जवळपास अर्ध्याहून अधिक प्रश्न, तसेच उत्तरांच्या पर्यायांमध्ये चुकीचे शब्द, शुद्ध लेखन आणि टंकलेखनाच्या चुका होत्या. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडाला.
यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, यापूर्वी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा मार्चपासून सुरू होऊन जूनअखेरपर्यंत चालायच्या. यावेळी परीक्षेबाबत अनिश्चितता होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे यूजीसीच्या मान्यतेनुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार विद्यापीठाने ९ ऑक्टोबरपासून या दोन्ही अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे आयोजन केले. यावेळी प्रश्नपत्रिका तपासण्यासाठी वेळच मिळाला नाही. तब्बल १६ हजार प्रश्नपत्रिका काढल्या असून, रोज ५०० पेपर घेतले जात आहेत. अभ्यास मंडळाच्या चेअरमनने प्रश्नपत्रिका अचूक आहेत की नाही, याची तपासणी करणे गरजेचे असते. मात्र, यावेळी तेवढा वेळ नव्हता.
वंचित विद्यार्थ्यांची माहिती मागविलीदरम्यान, पदवी, पदव्युत्तरच्या अभ्यासक्रमात ९, १० व १२ ऑक्टोबर रोजी काही विद्यार्थी तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन परीक्षा देऊ शकले नसतील. अशा विद्यार्थ्यांची माहिती परीक्षा विभाग जमा करीत आहे. या विद्यार्थ्यांना नेमका कोणता ऑनलाईन पेपर देता आला नाही, अशी माहिती विद्यार्थ्यांनी परीक्षा मंडळ संचालकांच्या मेल आयडीवर पाठविण्याचे आवाहन परीक्षा मंडळ संचालकांनी केले आहे.
कोणत्या होत्या पेपरमध्ये चुका‘साहित्य संमेलनाचे’ या शब्दाऐवजी ‘साहित्य सामेलान्चे’, याशिवाय ‘नियात्कालीनाचे’, ‘प्रकाशणसंस्त्या’, ‘शेकरराव मोहिते’, ‘लाकश्मिकांत तांबोळी’, ‘दे दान सुटे गिर्हान’, ‘नागनाथ कोथापाल्ले’, ‘आत्मचरित्र्या’, ‘बुलतं’च्या ऐवजी ‘बहुत’ आणि ‘दया पवार’च्या ऐवजी ‘द्या पवार’ अशा एक ना अनेक चुकीच्या शब्दांनी विद्यार्थ्यांची भंबेरी उडाली.