देवगाव रंगारी : सतत पर्यावरणाचा समतोल बिघडत असून त्यामुळे विविध नैसर्गिक समस्या निर्माण होऊन त्यांचा परिणाम ॠतुचक्रावर होत आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ अशा चक्रव्यूहात शेतकरी वर्ग सापडल्याने शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. त्याकरिता प्रत्येक शेतकऱ्याने आता पर्यावरण बदलाचा अभ्यास करुन शेतीचे नियोजन करावे, असे प्रतिपादन प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी सोमवारी केले.
ताडपिंपळगाव येथे ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकऱ्यांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंजाबराव डख बोलत होते. ते गेल्या दोन वर्षांपासून बदलत्या हवामान विषयाचा अभ्यास करीत असून त्यांचे आतापर्यंतचे अंदाज तंतोतंत खरे ठरले आहेत. या कार्यक्रमात त्यांनी विविध विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी सरपंच सुशीला अरुण सोनवणे, उपसरपंच सतीश शेळके, ग्रामसेवक विलास पाडवी आदी उपस्थित होते.