- रुचिका पालोदकर
औरंगाबाद : कला, साहित्य, संस्कृती यांची उज्ज्वल ऐतिहासिक परंपरा सगळ्या जगाला सांगणाऱ्या औरंगाबाद शहरात मात्र बाहेरून येणाऱ्या कलावंतांची चांगलीच परवड होत आहे. नुकत्याच झालेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान कलावंतांवर चक्क फुटक्या आरशात पाहून मेकअप करण्याची आणि तुंबलेल्या स्वच्छतागृहात नाक चिमटीत धरून जाण्याची वेळ आली. मनपाची दोन्ही नाट्यगृहे बंद अवस्थेत असल्यामुळे शहरावर सांस्कृतिक अवकळा ओढवल्याचे हे चित्र रंगकर्मींना खिन्न करणारे आहे.
ज्येष्ठ गायक अरुण दाते यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शहरात नुकताच ‘नवा शुक्रतारा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होऊन गेला. या कार्यक्रमासाठी अरुण दाते यांचे चिरंजीव अतुल दाते, गायक मंदार आपटे, श्रीरंग भावे, अभिनेत्री अनुश्री फडणीस, मनीषा निश्चल हे कलाकार शहरात आले होते. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे हा सांगीतिक कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या आधी ग्रीनरूममध्ये तयार होण्यासाठी गेलेल्या कलाकारांना तेथील अवकळा आलेली एके क गोष्ट पाहून आपण ऐतिहासिक नगरी औरंगाबादेत आहोत की अन्य कुठे, असा प्रश्न पडला. येथे धड आरसाही उपलब्ध नव्हता. शेवटी एक फुटका आरसा आम्हाला सापडला आणि त्यात पाहून आम्ही कसाबसा आमचा मेकअप उरकला. आरशापासून ते स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्यापर्यंत सगळ्याच गोष्टींची येथे असुविधा आहे, असे सांगत कलाकारांनी या बाबतीत प्रचंड नाराजी व्यक्त केली.
महापालिकेची दोन्ही नाट्यगृहे सध्या बंदावस्थेत आहेत आणि त्यांचा प्रश्न लवकर मार्गी लागण्याची तसूभरही शक्यता नाही. नाट्य व्यावसायिक पवन गायकवाड म्हणाले की, संत तुकाराम नाट्यगृहाच्या खाजगीकरणासाठी मनपाकडून टेंडर काढण्यात आले आहे. यामुळे हे नाट्यगृह कार्यक्रमांसाठी भाड्याने देणे बंद केले आहे. १ कोटी रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असणाऱ्या संस्थेला ३ वर्षांसाठी हे नाट्यगृह चालवायला दिले जाईल, असे मनपाकडून सांगण्यात येत आहे; पण ही गोष्ट पूर्णपणे अव्यवहार्य असून, याबाबतीत पुन्हा विचार करावा, असे रंगकर्मींचे म्हणणे आहे. संत एकनाथ रंगमंदिराचे कामकाज जून महिन्यापर्यंत पूर्ण होईल, असे अपेक्षित होते. मात्र, कंत्राटदाराने मनपाकडून पैशांचा पुरवठा होत नसल्यामुळे काम थांबवले आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीचा जून महिना उजाडेपर्यंत तरी कलापे्रमींना वाट पाहावी लागणार, असे दिसते.
नाट्यप्रयोगांसाठी विद्यापीठाचा पर्याय दोन्ही नाट्यगृहांची ही स्थिती आणि खाजगी नाट्यगृहांची कमी आसनक्षमता व न परवडणारे दर यामुळे नाट्य व्यावसायिकांना सध्या थेट विद्यापीठाकडे धाव घ्यावी लागत आहे. मे महिनाअखेरीस आणि नुकतेच २३ जून रोजी विद्यापीठातील नाट्यगृहात दोन मोठी नाटके झाली. या नाट्यप्रयोगांना रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. नाट्यप्रयोगांसाठी सध्यातरी विद्यापीठाचा पर्याय निर्माण झाला आहे; पण नृत्यसंगीताचे लहान-मोठे कार्यक्रम असल्यास जायचे कुठे किंवा कार्यक्रम सध्या करायचे की नाही, असा विचारही आयोजक करीत आहेत.