लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भारतात उपचारासाठी रुग्णांना स्वत:चे पैसे खर्च करावे लागतात. उपचारासाठी अनेकदा पैसे अपुरे पडतात. त्यामुळे उपचारापासून दूर राहिल्याने जीव गमावण्याची वेळ अनेकांवर येते. तुलनेत परदेशांमध्ये प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची जबाबदारी सरकारच उचलते. त्यामुळे आजारांचे वेळीच निदान आणि उपचार होतात, असे म्हणत जर्मनीचे हृदयरोग्यतज्ज्ञ डॉ. कार्स्टन शोफे यांनी भारतातील आरोग्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली.इंडियन कॉलेज आॅफ कार्डिओलॉजी आणि फिजिशियन्स असोसिएशन आॅफ औरंगाबादतर्फे आयोजित ‘कपकॉन-२०१८’ या दोनदिवसीय परिषदेचा रविवारी समारोप झाला. यावेळी डॉ. कार्स्टन शोफे बोलत होते. परिषदेत हृदयरोगावर सखोल चर्चा झाली. डॉ. सतीश रोपळेकर, डॉ. कांचन रोपळेकर, डॉ. आनंद देवधर, डॉ. विलास मगरकर, डॉ. संजय पाटणे यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. आशिष देशपांडे, डॉ. शिरीष देशमुख, डॉ. मकरंद नाईक, डॉ. मिलिंद खर्चे, डॉ. योगेश बेलापूरकर उपस्थित होते.डॉ. कार्स्टन शोफे म्हणाले, कॅन्सरइतकाच हृदयविकार गंभीर आहे. हृदयविकारामुळे व्यक्तीच्या गुणवत्तापूर्ण आयुष्यावर परिणाम होतो. त्यामुळे हृदयरोगाचे वेळीच उपचार आणि निदान करणे आवश्यक ठरते. मुंबईचे डॉ. शेखर अंबेरकर म्हणाले, हृदय बंद पडणे म्हणजे पंपिंग कमी होणे असा समज आहे; परंतु हृदयाचे स्नायू जाड होऊनही पंपिंग क्षमता मंदावते. त्यातूनही हृदय बंद पडू शकते. रक्तदाब सामान्य असतानाही हा धोका संभवतो. त्यामुळे हृदयाकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे डॉ. अंबेरकर म्हणाले.
खर्च रुग्णांना करावा लागल्याने भारतात गंभीर स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 1:39 AM