वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत विनामास्क फिरणाऱ्यांनी पोलिसांची चांगलीच धास्ती घेतली आहे. गत आठवडाभरात पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्या जवळपास २५० जणांवर गुन्हे दाखल केले.
उद्योगनगरीत कोरोनाचा संसर्ग वाढतच चालल्यामुळे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता व आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपाययोजना आखल्या. विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला ग्रामपंचायती व पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत पकडलेले विनामास्कधारक दंड भरून पुन्हा विनामास्क फिरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.
दंडाने फारसा परिणाम होत नसल्याचे लक्षात आल्यावर पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, पोलीस उपायुक्त डॉ. निकेश खाटमोडे-पाटील यांच्या आदेशावरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत, वाळूजचे निरीक्षक संदीप गुरमे, वाहतूक शाखेचे निरीक्षक जनार्दन साळुंके व त्यांच्या सहकाऱ्यांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे सुरू केले. मुख्य बाजारपेठ, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मुख्य चौक, हॉटेल, किराणा दुकान, मॉल्स आदी ठिकाणी पोलिसांनी छापे टाकले. या कारवाईत विनामास्क सापडलेले दुकानदार, हॉटेलचालक, ग्राहक, दुचाकी व चारचाकी, तसेच पादचारी आदींना पकडून त्यांच्यावर एमआयडीसी व वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. गुन्हे दाखल होऊन न्यायालयाच्या खेट्या माराव्या लागणार असल्याने आता नागरिकांनी पोलिसांची चांगलीच धास्ती घेतली आहे.
वाळूज व एमआयडीसी ठाण्यात गुन्हे दाखलबजाजनगर, पंढरपूर, रांजणगाव, जोगेश्वरी, सिडको वाळूज महानगर, वडगाव, साऊथसिटी आदी ठिकाणी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत आठवडाभरात १८७ जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. वाळूज पोलीस स्टेशन हद्दीतील वाळूज, लिंबेजळगाव, नारायणपूर, शिवराई, शेंदुरवादा आदी ठिकाणी जवळपास ५० जणांवर वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.