औरंगाबाद : शहरात आजपासून रात्रीची संचारबंदी लागू होणार आहे. रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही संचारबंदी असेल, 14 मार्च पर्यंत हा निर्णय लागू असेल. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त यांच्यात आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात झाला. याकाळात जीवनावश्यक वस्तू, उद्योग, कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. पुढील टप्प्यात आठवडी बाजार आणि भाजीमंडई बाबत निर्णय होणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात १३२ कोरोना रुग्णांची भर पडली, तर १११ जण कोरोनामुक्त झाले. तसेच उपचार सुरू असताना एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ९४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४८ हजार ७७० झाली आहे, तर आतापर्यंत ४६ हजार ५७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,२५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या १३२ रुग्णांत मनपा हद्दीतील सर्वाधिक ११३ ग्रामीण भागातील १९ रुग्णांचा समावेश आहे.