छत्रपती संभाजीनगर : शेकडो बँक खाती उघडून बेनामी व्यवहार करणाऱ्या रॅकेटमध्ये सुरतच्या अवघ्या १९ वर्षांच्या मुलावर रोख रक्कम काढण्याची जबाबदारी होती. सायबर पोलिसांच्या पथकाने त्याला रविवारी अटक केली. हर्षल मुकेशभाई काछडीया (१९, रा. पिपलिया फडीया, महादेव चौक, सुरत, गुजरात) असे आरोपीचे नाव आहे.
बुधवारी गुप्तचर यंत्रणेने हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील रॅकेट उघडकीस आणले. यात आतापर्यंत सुरतचा उत्सवकुमार चंदुभाई भेसानिया (२३), ऋषिकेश भागवत (२३, रा. एन-६), अनुराग घोडके (२१, रा. जाधववाडी), ज्ञानेश्वर पठाडे (२४, रा. बिडकीन) यांना अटक करण्यात आली. देशविघातक कृत्यासाठी या रॅकेटचा वापर होत असल्याचा प्राथमिक संशय तपास यंत्रणांना आहे. त्याशिवाय सट्टा बाजाराच्या अब्जावधी रुपयांचा या रॅकेटद्वारे व्यवहार केला जातो. परंतु, बहुतांश संवाद टेलिग्रामद्वारे झाल्याने तपास यंत्रणेला त्यातील अधिकच्या नेटवर्कची माहिती अद्याप हाती लागलेली नाही.
उत्सवकुमार नंतर हर्षलची महत्त्वाची भूमिकाउत्सवकुमारकडे बँक खाते उघडण्यासाठी तरुणांना आमिष दाखवणे, त्यांच्या खात्याचे पासबुक, धनादेश, एटीएम कार्ड घेऊन सुरतला जाण्याची जबाबदारी होती. पुढे त्या खात्यात रकमेचे ऑनलाइन व्यवहार झाल्यानंतर रोख काढून पुढील सूत्रधारांना पोहोचवण्याची जबाबदारी हर्षलवर होती. तो सातत्याने उत्सवकुमारला ऑनलाइन व्यवहारासाठी सूचना करत होता. शिवाय, उत्वसकुमारपेक्षा त्याच्याकडेच अधिक जबाबदारी व रॅकेटच्या सूत्रधारांची माहिती असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. निरीक्षक गीता बागवडे यांच्या पथकाने त्याला न्यायालयात हजर केले असता १८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. व्ही. मुसळे यांनी सोमवारी दिले.
टेलिग्रामद्वारे संपर्कातअटकेतील आरोपी सुरजकुमार आणि शिवकुमार झा यांच्यासोबत टेलिग्रामद्वारे संपर्कात हाेते. त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक दिल्लीला गेले आहे. शिवाय आरोपी शनैश्वर लक्ष्मण जाधव (२४) याचेही नाव निष्पन्न झाले आहे. तो सध्या मुळशीच्या सुसगाव येथे वास्तव्यास आहे. तो जुन्नर तालुक्यातील मंगरुळ पारगावचा मूळ रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला देखील नोटीस बजावली आहे.