छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे एकाच हॉटेलमध्ये बुधवारी रात्री मुक्कामी होते. या तिघांनी एकमेकांच्या भेटी घेतल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. परंतु तिघांनीही गुरुवारी सकाळी माध्यमांशी बोलताना एकमेकांच्या भेटीचा इन्कार केला.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या सोमवारी मतदान आहे. शनिवारी सायंकाळी प्रचार संपणार आहे. त्यामुळे महायुती, महाविकास आघाडीच्या नेत्यांचे मुक्काम शहरात वाढले आहेत.
मी त्यांना कधीच भेटू शकत नाही...माजी गृहमंत्री देशमुख म्हणाले, फडणवीस यांना मी कधीच भेटू शकत नाही. माझी भेटण्याची इच्छाही नाही. ४ जूनला महाराष्ट्रात चमत्कार दिसेल. आमचा मोठा विजय होईल.
सामंतांनी उत्तर देणे टाळले... उद्योगमंत्री सामंत यांनीही भेटीप्रकरणी थेट उत्तर देणे टाळले. सामंत ११ मेपर्यंत शहरात मुक्कामी आहेत. ते महायुतीच्या उमेदवारासाठी उद्योजकांच्या विविध संघटनांच्या भेटी घेणार आहेत.
फडणवीसांनीही नाकारली भेटमाझी व देशमुख यांची भेट झाली नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, ठाकरे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना आता डॉक्टरची गरज आहे. ते रोज काही तरी बरळत असून त्यांना शिव्या देण्याशिवाय सध्या काहीही सुचत नाही. जनतेने त्यांना रिजेक्ट केलेले आहे. ठाकरेंचे गाइड हे शरद पवार असून ते बोलतील तसेच ठाकरे करतील, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.