औरंगाबाद: सतरा वर्षीय मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपावरून पिशोर (ता. कन्नड)पोलिसांच्या कोठडीत असताना शुक्रवारी सकाळी स्वच्छतागृहात ॲसिड पिलेल्या आरोपीचा उपचारा दरम्यान शनिवारी सायंकाळी घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. पिशोर ठाण्याचे निरीक्षक आणि तक्रारदार मुलीच्या वडिलाला विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मयताच्या नातेवाईकांनी घेतल्याने घाटी रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. भगवान हरदास महालकर (३८, रा.खांडी पिंपळगाव,ता.खुलताबाद ) असे मयताचे नाव आहे.
या घटनेविषयी प्राप्त माहितीनुसार, भगवान वारकरी संप्रदायाचा होता. त्याने काही दिवसापूर्वी जैतखेडा येथील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते. याप्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनंतर पिशोर पोलिसांनी भगवान आणि पीडितेला शोधून काढले. पीडितेच्या जबाबानंतर पोलिसांनी भगवान विरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवून त्याला बुधवारी अटक केली होती. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी सकाळी भगवानच्या विनंतीवरुन पोलीस त्याला लघुशंकेसाठी स्वच्छतागृहात घेऊन गेले. यावेळी भगवानने तेथील ॲसिड प्राशन केले. त्यानंतर पोलिसांनी त्याला तातडीने औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले होते. शनिवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास भगवानचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पिशोर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
प्रेत ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार भगवानने विष पिल्याचे पोलीस सांगत आहेत. असे असले तरी ठाण्यात विष आले कुठून असा संतप्त सवाल मयताचा भाऊ गोकुळ महालकरने केला. त्याला विष पाजून मारण्यात आले असावे असा संशय त्यांनी व्यक्त केला. भगवानच्या मृत्यूप्रकरणी सबंधित फौजदार आणि मुलीचे वडिल यांच्याविरूध्द जोपर्यंत खुनाचा गुन्हा नोंद होत नाही, तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांच्यासह नातेवाईकानी घेतली. घाटीतील शवविच्छेदन गृहासमोर नातेवाईक जमले होते.