औरंगाबाद : मसाल्यातील प्रमुख पदार्थ असलेली खसखस ६०० रुपये पावशेर म्हटल्यावर ग्राहकांचे डोळे पांढरे होत आहेत. दोन वर्षांपूर्वी ५०० रुपये किलो दराने मिळणारी खसखस एकदम २५०० रुपये किलो दरावर जाऊन पोहोचली आहे.
केंद्र सरकारने देशात होणारी खसखसची आयात मागील २ वर्षांपासून बंद केली आहे. यामुळे देशात खसखसचा तुटवडा जाणवत आहे. खसखसचे उत्पादन सहजासहजी घेता येत नाही. त्यासाठी सरकारकडून परवानाधारक उत्पादकांना पट्टे वाटप केले जातात. देशात मध्य प्रदेश, राजस्थान राज्यात खसखसचे उत्पादन सेंट्रल ब्यूरो ऑफ नार्कोटिक्सच्या परवानगीने घेतले जाते. या राज्यातील खसखसचे उत्पादन ३ हजार टनापर्यंत जाते. हे उत्पादन मागणीच्या तुलनेत कमी पडत असल्याने विदेशातून आयात करावी लागते.
जगातील १५ देशांत खसखसचे उत्पादन घेतले जाते. देशातील उत्पादकांना जास्त भाव मिळावा, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. यामुळे खसखसची आयात बंद करण्यात आली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. जर आयात पुन्हा सुरू झाली तर खसखसचे भाव ५०० रुपयांपर्यंत खाली येतील, असेही व्यापाऱ्यांनी सांगितले.
८ टनाने विक्री घटलीखसखसमध्ये प्रचंड भाववाढ झाल्याने त्याचा परिणाम विक्रीवर झाला आहे. शहरात खसखसची महिन्याकाठची विक्री १० टनावरून अवघ्या २ टनावर खाली येऊन पोहोचली आहे. भाव ऐकूनच ग्राहक खसखस नको म्हणत आहेत, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.