लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कटलरी व बेकरीचे साहित्य असलेल्या गोदामाला आग लागून सुमारे पंधरा लाखांचे नुकसान झाले. शहरातील खडकपुरा भागात शनिवारी सकाळी दहा वाजता ही घटना घडली.शहरातील अलंकार चौक भागात सलीम शेख व अनिस शेख यांचे मुस्कान प्लॉस्टिक शॉपी व पीकनिक बेकरी, ही दोन दुकाने आहेत. या दुकानांसाठी लागणारे साहित्य शेख खडकपुरा भागातील पत्र्याच्या गोदामात साठवतात. सकाळी गोदामाच्या पाठीमागील बाजूस असेलला कचऱ्याचा ढीग कुणीतरी पेटवला. कचऱ्याच्या ढिगातून आगीची ठिगणी गोदामात आल्यामुळे गोदामातील प्लॉस्टिकच्या साहित्याने पेट घेतला. गोदामातून धुराचे लोळ बाहेर येऊ लागले. प्लॉस्टिक साहित्याने पेट घेतल्यामुळे आग वाढतच गेली. गोदामाला आग लागल्याचे शेख यांच्या लक्षात येताच शेख अग्निशमन दलास माहिती दिली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोचले. खडकपुरा भागातील अरुंद रस्त्यामुळे अग्निशमन दलास आगीवर नियंत्रण मिळविताना अडचणी आल्या. अग्निशमन विभागाचे बी. एम. जाधव, कुंदन खर्डेकर, उत्तम राठोड, शिवराज काळे, मन्नुसिंग सूर्यवंशी, विश्वनाथ बनसोडे, सागर गडकरी, कमलसिंग राजपूतर, आर.के. बनसोडे, शेख रफिक या कर्मचाऱ्यांनी दोन बंबाच्या मदतीने दीड तासात आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे गोदामाला लागून असलेली घरे आगीपासून वाचली. आगीत कटलरी साहित्य, तीन बेकरी मशीन, हातगाड्या, पत्रे व अन्य साहित्य जळून सुमारे १५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदर बाजार पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
कटलरी साहित्याचे गोदाम खाक
By admin | Published: May 28, 2017 12:20 AM