- प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : पाळीव कुत्रा व मांजरांसाठी शहरात सलून सुरू झाले, हे वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. या सलूनमध्ये आपल्या लाडक्या मोतीच्या कटिंगसाठी चक्क ५०० ते १ हजार रुपये मोजणारे हौशी मालकही शहरात आहेत. पाळीव कुत्र्यांसाठी सलूनमध्ये सध्या ‘झिरो कट’ प्रसिद्ध झाला आहे आणि माणसांप्रमाणेच हे प्राणी सलूनमध्ये ऐटीत बसलेले दिसतात.
ग्रामीण भागात घोडा, म्हैस, मेंढी यांची हजामत केली जाते. मात्र, घरातील पाळीव कुत्रा व मांजरीसाठीही कटिंग सलून सुरू होईल व त्या दुकानात जाऊन ऐटीत खुर्ची, टेबलावर बसून टॉमीची कटिंग केली जाईल याचा कुणी विचारही केला नसेल. शहरात पाळीव प्राण्यांसाठी सलून उघडण्यात आले आहे. आता सध्या मालक सांगेल तशीच कुत्र्यांची व मांजरांची कटिंग करून दिली जात आहे. कुत्रा असो वा मांजर यांच्यासाठी ‘झिरो कट’ प्रसिद्ध झाला आहे. सलूनमध्ये पाळीव प्राण्यांची कटिंगच केली जात नाही तर त्यांचे नखही कापले जातात, त्यांचे कान साफ करून दिले जातात. हे सर्व झाल्यावर अंघोळ करण्यासाठी ५०० रुपये मोजावे लागत आहेत. ‘हौसेला मोल नसते’ हेच खरे.
एका कटिंगला एक ते दीड तासएका कुत्र्याच्या कटिंगसाठी एक ते दीड तास लागतो. त्यासाठी त्याच्या तोंडाला विशिष्ट प्रकारचे प्लास्टिकचे मास्क लावले जाते. पहिल्या कटिंगच्या वेळीस त्रास देतात, पण नंतर ते चुपचाप कटिंग करून घेतात. कुत्रा, मांजराची कटिंग करणे, अंघोळ घालणे, नख कापणे यासाठी काही युवकांना प्रशिक्षण दिले आहे.- जयेश कुलकर्णी, ॲनिमल हेअर स्टायलिश