औरंगाबाद : कंपनीत कार्यरत असताना एका अभियंता तरुणीनेच कंपनीचा सुमारे १४ कोटी ४७ लाख रुपये किमतीचा गोपनीय डेटा चोरून नेल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. ही चोरी २२ ऑक्टोबर ते २४ डिसेंबर २०२१ दरम्यान वाळूज एमआयडीसीतील एण्ड्यूरन्स टेक्नॉलॉजी या कंपनीत झाली असून याप्रकरणी कंपनीने सायबर पोलीस ठाण्यात आरोपी तरुणी विरोधात गुन्हा नोंदविला.
शिवानी कुरूप (२६, रा. शकुंतला अपार्टमेंट, समर्थनगर) असे आरोपी तरुणीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार तक्रारदार रोहित महेंद्र साळवी हे वाळूज औद्योगिक वसाहतीमधील एण्ड्यूरन्स टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीत संशोधन विभागात वरिष्ठ व्यवस्थापक आहेत. गतवर्षी २२ ऑक्टोबर ते २४ डिसेंबर २०२१ या कालावधीत आरोपी शिवानी ही सुद्धा या कंपनीत कार्यरत होती. यादरम्यान आरोपीने स्वत:च्या फायद्यासाठी आणि कंपनीचे नुकसान व्हावे, या उद्देशाने कंपनीच्या मालकीचा गोपनीय डेटा (माहिती) इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर करून चोरून फसवणूक केली.
दरम्यान, ती गतवर्षी डिसेंबर महिन्यात कंपनी सोडून निघून गेली. ती निघून गेल्यानंतर कंपनीने तिने वापरलेल्या संगणकाची तपासणी केली असता तिने कंपनीची गोपनीय माहिती चोरल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सुमारे १४ कोटी ४७ लाखाचा हा डेटा आहे. याविषयी कंपनीच्या वतीने रोहित साळवी यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून याप्रकरणी १९ मे रोजी शिवानी विरोधात फसवणूक, विश्वासघात करणे, कंपनीचे नुकसान करणे, सायबर कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक गौतम पातारे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.