औरंगाबाद : ऑनलाईन मागवलेला ड्रेस न आवडल्याने पैसे परत मागितल्यांनतर बँक खात्याची माहिती विचारून घेत सायबर भामट्यांनी एका महिलेच्या खात्यातून परस्पर व्यवहार करीत ९९ हजार ९०० रुपये काढून घेतल्याची घटना दि.१५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. याविषयी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला.
टिळकनगरातील महिलेने आॅनलाईन शॉपिंग पोर्टलवरून एक पंजाबी ड्रेस मागविला होता. त्यांनी पसंत केलेल्या ड्रेसऐवजी दुसराच ड्रेस कंपनीने त्यांना पाठविल्याचे समजल्याने त्यांनी कंपनीच्या ग्राहक तक्रार निवारण नंबरवर संपर्क साधून ड्रेस परत घेऊन पैसे पाठविण्याचे सांगितले. तेव्हा कंपनी कर्मचाऱ्याने त्यांना गुगल पे अथवा फोन पे यापैकी कशावरून तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा करू, असे विचारले. तक्रारदार यांनी त्यांना गुगल पे वरून पाठवा, असे सांगितल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. हा मेसेज तक्रारदार यांनी वाचण्यासाठी उघडला असता त्यांच्या खात्यात १३५० रुपये जमा झाल्याचा अन्य एक मेसेज आला. यानंतर काही वेळातच त्यांच्या खात्यातून ३० हजारांचे दोन, तर १९ हजार ७०० रुपये आॅनलाईन अन्य खात्यात वर्ग होत असल्याचे मेसेज प्राप्त झाले. या व्यवहाराविषयी बँकेला संशय आल्याने बँकेने तक्रारदार यांच्याशी संपर्क साधून हे व्यवहार तुम्ही करीत आहात का, असे विचारले. तक्रारदार यांनी नाही म्हटल्यानंतर बँकेने पुढील व्यवहार रोखले. तोपर्यंत तक्रारदार यांच्या खात्यातून ९९ हजार ९०० रुपये आरोपींनी आॅनलाईन पळविले होते.