औरंगाबाद : पर्यावरणाचे रक्षण आणि इंधन बचतीसाठी १ डिसेंबर रोजी महापालिकेतील अधिकाऱ्यांनी कार्यालयात येताना आणि घरी जाताना सायकलचा वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी केले आहे.
नोव्हेंबर महिन्यात हा उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली. महापालिकेतील जेमतेम सात ते आठ अधिकाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. प्रशासक पांडे यांनी शक्य असल्यास सायकलवर यावे असे आवाहन केले आहे.
वाढती लोकसंख्या आणि त्यासोबतच वाहनांच्या वापरात वाढ झाली असून, वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात इंधनाचा वापर होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस प्रदूषणातही वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे रक्षण आणि इंधन बचतीसाठी पांडेय यांनी मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या कार्यालयीन पहिल्या दिवशी ‘सायकल’द्वारे कार्यालयात येण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या सायकल फॉर चेंज चॅलेंजमध्ये औरंगाबादने सहभाग घेतला आहे. शहर सायकल चालविण्यासाठी सुरक्षित असावे या दृष्टीने ‘एएससीडीसीएल’ विविध प्रकारचे नियोजन करत आहे. सायकलिंगला चालना देण्यासाठी पुढाकार घेतल्याने विविध स्वयंसेवी संस्था, सायकलिंग संघटना आणि नागरिक एएससीडीसीएलला पाठिंबा देत आहेत.
डिसेंबर महिना कचरा वर्गीकरणासाठी
मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय म्हणाले की, स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या अनुषंगाने महिन्याच्या पहिल्या दिवशी कार्यालयीन कामास येताना- जाताना मनपा अधिकारी, कर्मचारी ,नागरिक शक्य असल्यास सायकल चालवतील. प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे की, त्यांचे शहर स्वच्छतेसाठी राष्ट्रीय पातळीवर परिचित असावे. परंतु, जेव्हा नागरिक आणि महानगरपालिका एकत्र काम करतील तेव्हाच हे साध्य होणार आहे. महानगर पालिकेने डिसेंबर महिना कचरा वेगळा करण्याचा महिना म्हणून जाहीर केला आहे. नागरिक, व्यावसायिक संस्थांनी मनपा कर्मचाऱ्यांना कचरा देताना कचरा ओला, कोरडा आणि धोकादायक अशा प्रकारे विभागणी करून द्यावे.