औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड किल्ल्यास भेट देण्याच्या ओढीने नागपुरातील ७ युवती व ५ युवक सायकलीवर मैलोनमैल प्रवास करत आहेत. ओढ एवढी तीव्र आहे की, औरंगाबादपर्यंत प्रवास करूनही या सायकलस्वारच्या चेहरा प्रफुल्लित होता.
नागपूर ते रायगड किल्ला अंतर सुमारे ८७० कि. मी.चे आहे. स्त्री सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी नागपूरच्या धाडस समूहाने हा सायकल प्रवास आयोजित केला आहे. २० मार्च रोजी शिवतीर्थ गांधी गेट महाल, नागपूर येथून सकाळी ९ वाजता या धाडसी युवक, युवतींनी सायकल प्रवास सुरू केला. त्यांनी गुरुवारी (दि.२५) दुपारी औरंगाबाद गाठले. यादरम्यान येणाऱ्या प्रत्येक गावात त्यांनी सामाजिक संदेश देण्याचे कार्यही केले. येत्या ३१ तारखेला रायगडावर पोहचण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे. सायकलस्वारांमध्ये वर्षा घाटोले, रक्षा राहुलकर, प्रियंका वैद्य, धनश्री भोयर, नेहारिका लांडगे, पपीहा नागपूरकर, निशा भोसले, सुमीत शरणागत, अविनाश कटरे, शुभम मुंडले, निशांत निदेकर व अनिरुद्ध सोलाट यांचा समावेश आहे.
चौकट
जिद्दीसमोर थकवा गायब
आम्हाला १० दिवसांत रायगड किल्ला गाठायचा आहे. तोही सायकल चालवून. नुसते अंतर कापायचे नाही तर नारीशक्ती महान याचा नव्याने देशाला संदेश द्यायचा आहे. आमच्या जिद्दीपुढे थकवा गायब झाला आहे. हेच आमचे यश होय.
वर्षा घाटोले
धाडस समूह