लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहर विकास आराखड्यानुसार जळगाव रोड ते पिसादेवी रोड तब्बल १२० फूट दर्शविण्यात आला आहे. मागील काही वर्षांमध्ये भूमाफियांनी या रस्त्यावर प्लॉटिंग पाडून नागरिकांना जागा विकली. नागरिकही घरे बांधून राहत आहेत. आता हा रस्ता सिमेंटने बांधण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. १२० फुटांचा हा रस्ता अवघा २५ ते ३० फूट रुंद शिल्लक आहे. रस्ता रुंदीकरणासाठी मागील तीन दिवसांपासून मनपाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या भागातील नागरिक कडाडून विरोध दर्शवीत आहेत.जळगाव रोड ते पिसादेवी रोडवर काळी माती आहे. या भागातून ये-जा करताना नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागतो. शहर विकास आराखड्यानुसार हा रस्ता १२० फूट रुंद दर्शविण्यात आला आहे. महापालिकेने त्यानुसार सिमेंट रस्ता तयार करण्यासाठी निविदा काढली. १ कोटी रुपये खर्च करून पहिल्या टप्प्यात अर्धा रस्ता गुळगुळीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. कंत्राटदाराला काम करायचे आहे. त्यासाठी मागील तीन दिवसांपासून मनपाचे कर्मचारी कंत्राटदाराला रस्त्याची मार्किंग करून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. या भागातील नागरिक मार्किंगला कडाडून विरोध दर्शवीत आहेत. आज प्रत्यक्षात जेवढा रस्ता आहे, तेवढ्याच जागेत रस्ता करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. कंत्राटदाराला तर मनपाने १२० फूट रुंद रस्ता दर्शविला आहे. गुरुवारी सकाळी मनपाचे कर्मचारी मयूर पार्क भागात कंत्राटदाराला मार्किंग देण्यासाठी गेले असता नागरिकांनी त्यांना अक्षरश: पिटाळून लावले. त्यामुळे या भागात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. जळगाव रोड ते पिसादेवी रोडवर मागील काही वर्षांमध्ये भूमाफियांनी प्लॉटिंग पाडून मनपाचा रस्ताच विकून टाकला आहे. या रस्त्यावर तब्बल ३० पेक्षा अधिक घरे आहेत. रस्त्यावरील ही अतिक्रमणे काढल्याशिवाय मनपाला रस्ताच तयार करता येणार नाही. मनपाने या भागात अतिक्रमणांना अभय दिल्यास भूमाफियांची हिंमत आणखी वाढेल.
डी. पी. रस्त्यावर भूमाफियांकडून प्लॉटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 1:16 AM