- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : इंदूर शहर अल्पावधीत चकचकीत झाले. २५ ते ३० फुटांचे जुने रस्ते आता ८० आणि १०० फूट रुंद करण्यात आले. शहरात कुठेच एकही अनधिकृत होर्डिंग दिसत नाही. कितीही मोठा पाऊस झाल्यास रस्त्यावर पाणी साचत नाही. आधुनिक इंदूर शहराचा कायापालट करण्यात तत्कालीन आयुक्त मनीष सिंह यांचा सिंहाचा वाटा आहे. आता ते उज्जैनचे जिल्हाधिकारी आहेत. त्यांनी ‘दबंग’ बनून स्मार्ट इंदूर शहराचा पाया कसा रचला याची रंजक माहिती अशी-
२०१५ पर्यंत इंदूर शहरही देशातील इतर शहरांप्रमाणेच प्रचंड घाण, अरुंद रस्ते, चोहीकडे अधिकृत होर्डिंग, ठिकठिकाणी ड्रेनेज वाहू लागलेले, पावसाच्या पाण्याचा अजिबात निचरा नाही. अख्खी महापालिका दिवस-रात्र खाबूगिरीत मग्न होती. अशा विदारक अवस्थेत शासनाने मध्यप्रदेश आयएएस कॅडरचे मनीष सिंह यांची सप्टेंबर-२०१६ मध्ये इंदूर महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती केली. या हरफनमौला अधिकाऱ्याने विकास कसा करावा याचा उत्तम नमुना देशासमोर सादर केला.
सिंह सध्या उज्जैन येथे जिल्हाधिकारी आहेत. ‘लोकमत’ प्रतिनिधीसोबत तब्बल दीड तास त्यांनी गप्पा मारल्या. इंदूर शहराचा विकास कसा झाला हे त्यांनी नमूद केले. महापालिकेला कायद्याने दिलेल्या अधिकारांचा वापर करून आपण तीन वर्षांच्या कारकीर्दीत इंदूर शहराला स्वच्छतेत देशात नंबर वनचा खिताब मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले.
शहर स्वच्छतेसाठी महापालिकेचा यांत्रिकी विभाग सर्वप्रथम सक्षम केला. बाहेरून वाहनांची दुरुस्ती पूर्णपणे बंद केली. भाडेतत्त्वावरील वाहनांची हकालपट्टी करण्यात आली. १२०० वाहनांची शंभर टक्के दुरुस्ती मनपाच करते. त्यामुळे भ्रष्टाचार तर संपलाच, शिवाय पूर्वीपेक्षा शंभरपट दर्जेदार कामही होत असल्याचा दावा त्यांनी केला.
रस्ते रुंदीकरण मोहीमशहर विकास आराखड्यानुसार सर्व लहान रस्ते मोठे केले. मालमत्ताधारकांना फक्त एफएसआय दिला. एक रुपयाही आर्थिक मोबदला दिला नाही. ज्यांची रस्त्यांत पूर्णपणे मालमत्ता गेली त्यांना त्वरित पंतप्रधान आवास योजनेत घर दिले. रस्त्यांवर झोपड्या बांधून राहणाऱ्या इतर प्रांतातील नागरिकांना बसमध्ये बसवून गावी पाठवून दिले. हातगाड्यांचा मुक्त संचार होता. रस्त्यांवर हातगाडी दिसल्यास जागेवरच जेसीबीने हातगाडी मोडून जप्त करायची. दहा हजार हातगाड्यांचा बंदोबस्त केल्याचे सिंह यांनी सांगितले.
माफियांवर हल्लाबोलइंदूर शहरातील मोठा गुंड जगदीश यादव याची २५ हजारांहून अधिक जनावरे गावात फिरत असत. त्याला गोठे-जनावरे बाहेर नेण्याची विनंती केली. त्याने विनंती फेटाळून लावली. दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता मी स्वत: उभे राहून त्याच्या अनधिकृत घरांसह गोठ्यांवर बुलडोझर फिरविला. या घटनेनंतर मनपा कर्मचाऱ्यांवर चाकूहल्ला करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण महापालिका चवताळून कामाला लागली.
१ हजार कर्मचारी निलंबितइंदूर मनपात ७ हजार सफाई कामगार आहेत. त्यातील ८० टक्के निव्वळ कामचुकार होते. त्यांना साफसफाईची अगोदर ट्रेनिंग दिली. हजेरी सेंटरवर थम्ब इम्प्रेशन पद्धत आणली. योग्य सफाई न केल्यास जागेवरच १ हजार कर्मचाऱ्यांचे निलंबन केले. त्यापूर्वी सहा कामगार संघटनांच्या नेत्यांना विश्वासात घेतले. त्यांच्या निकटवर्तीय २०० कामगारांना आम्ही हात न लावता कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे आम्ही यशस्वी झाल्याचे सिंह यांनी हसत हसत सांगितले.
शहरात मनपाची चालते दादागिरी महात्मा गांधी रोडवर बीआरटीएसची स्वतंत्रपणे बससेवा सुरू आहे. प्रत्येक रस्ता, फुटपाथ गुळगुळीत झाला आहे. शहर पूर्णपणे अतिक्रमणमुक्त असून, शहरात मनपाची निव्वळ दादागिरी चालते. मनपाच्या परवानगीशिवाय नवरदेवाला आजही वरात काढता येत नाही. शहरात दिवसभर फिरा धूळ कणांचा त्रास नाही. जिकडे तिकडे हिरवळच हिरवळ दिसून येते, असेही सिंह यांनी सांगितले.