मराठवाडा : आपल्या आजूबाजूला काम करणा-या प्रत्येक व्यक्तीला नियमितपणे त्यांच्या कुटुंबाला वेळ देता येतो असे नाही. यातच जबाबदार पदावरील व्यक्तीला कामाचा व्याप व कुटुंबाची, मुलांची ओढ यातून खूप ओढाताण सहन कारवाई लागते. यामुळे त्यांच्या मुलांची त्यांच्या बद्दल नेहमीच तक्रार असते. या बालदिनी मराठवाड्यातील अशाच काही जबाबदार पदावरील व्यक्तींना त्यांचे काम, कुटुंबाची जबाबदारी व मुलांची ओढ याबद्दल बोलत केले आहे त्यांच्याच मुलांनी.
बाबा, तुम्ही मला फोन का करीत नाहीत?
उस्मानाबाद : सध्या सरकारी यंत्रणेवरचा लोकांचा विश्वास कमी होत चाललाय़ त्यामुळे त्यांचं कोणीतरी ऐकून घ्यावे असे वाटते़ ब-याचदा त्यांचे प्रश्न आपण मार्गी लावतोच असे नाही़ पण किमान त्यांचे ऐकून घेतले तरी त्यांना समाधान वाटते़ त्यामुळे त्यांना अटेंड करावंच लागतं़ कधी-कधी येतो कंटाळा, पण हे चालायचंच़, असे मनोगत दूरचित्रवाणी पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी त्यांची मुलगी गार्गी हिच्याशी बोलताना व्यक्त केले. बाबा, तुम्हाला सतत फोन घेण्याचा कंटाळा येत नाही का, असा त्यांच्या निरागस कन्येचा स्वाभाविक प्रश्न होता.
गार्गी : अहो बाबा, तुम्ही बाहेर असताना मला फोन का करीत नाहीत?राहुल : बेटा, बहुतांश वेळा खूपच काम असते़ अशावेळी शक्यतो ते जमत नाही़ तरीही कामातून थोडी उसंत मिळताच मी फोन करण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतो़ गार्गी : समजा मला खूप ताप आलाय आणि तुम्हाला महत्त्वाचं काम आलं तर मला सोडून जाणार?राहुल : कामाचे स्वरूप आधी समजून घेईऩ ते माझ्या अन्य सहका-यांकडून करणे शक्य असेल तर मी तुला सोडून जाणार नाही; पण खूपच महत्त्वाचे काम असेल आणि मलाच जावे लागणार असेल तर तुझी काळजी घेण्यास तुझ्या आईला सांगून जाईऩ शिवाय, फोनवरुन तुझ्याशी सतत बोलत राहीऩ तुझी काळजी हे माझे प्राधान्य आहे़गार्गी : आणि समजा तुम्हालाच खूप म्हणजे खूप थकवा आलाय, उठावेसुद्धा वाटत नाही, तरीही कामावर जाणार?राहुल : ब-याचदा ते परिस्थितीवर डिपेन्ड करतं़ आऱआऱ पाटील तुला माहितेयत ना? जेव्हा त्यांचे निधन झाले त्यावेळी मी असाच आजारी होतो़ तरीही जावे लागले़ त्यापाठोपाठ पानसरे यांची हत्या झाली़ त्याहीवेळी अशीच परिस्थिती होती़ त्यामुळेच आता रिपोर्टर निवडताना त्यांचा फिटनेससुद्धा पाहिला जातोय़ गार्गी : तुम्ही घरच्या ब-याच कार्यक्रमाला नसता़ ?राहुल : हो, अनेक वेळा ते शक्य होत नाही़ अगदी राजचे (मुलगा) तीन वाढदिवसही माझ्याकडून मिस झाले़ नातेवाईकांच्या कार्यक्रमांनाही जाता येत नाही़ एका पत्रकाराच्या जीवनात ही गोष्ट खूप कॉमन आहे़ वेळ मिळाला तर कार्यक्रम अटेंड करायला मला आवडेल की़गार्गी : तुम्ही आधी लहान रिपोर्टर होतात की डायरेक्ट एडिटर झालात बाबा?राहुल : मी सुरुवातीला लहान रिपोर्टरच होतो आणि आताही आहे़ तू पाहतेस ना की मी सतत पुस्तके, वृत्तपत्रे वाचत असतो़ सुरुवातीला मी एका चॅनेलला रिपोर्टर म्हणूनच काम सुरू केले़ ते पाहून एबीपीने मला मुंबईत काम करण्याची आॅफर दिली़ तेथे जवळपास सात वर्षे काम केले़ या काळात अभ्यास, संशोधन करायला मिळाले़ त्यातूनच आता मी या पदापर्यंत पोहोचलोय़ पण अजूनही मी मोठा नाही़ मी विद्यार्थीच मानतो स्वत:ला़
ड्यूटीमुळे आई न आल्यास रागवायचो
औरंगाबाद : पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावताना आई प्रॉमिस करूनही आमच्या शाळेतील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकली नाही की, मग आईला आपल्यापेक्षा जॉब महत्त्वाचा वाटतो का, असा प्रश्न पडे आणि हाच प्रश्न सोमवारी बालदिनाच्या पूर्वसंध्येला लोकमतच्या वतीने सीआयडीच्या पोलीस निरीक्षक डॉ. सुनीता मिसाळ-बडदे यांची मुलाखत घेताना त्यांच्या १४ वर्षीय कन्या राधिका हिने त्यांना विचारला. मुलाखतीच्या सुरुवातीला चिमुकलीने विचारलेल्या पहिल्याच प्रश्नाने डॉ. मिसाळ यांची कोंडी झाली आणि त्यांच्या डोळ्यात भावतरंग तरळले.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) औरंगाबाद युनिटमध्ये कार्यरत असलेल्या डॉ. सुनीता मिसाळ-बडदे खात्यात रुजू झाल्या तेव्हा त्यांची मुलगी राधिका साडेपाच वर्षांची, तर मुलगा सिद्धार्थ अडीच वर्षांचा होता. नोकरी आणि घरसंसार सांभाळण्याची तारेवरची कसरत करताना बºयाचदा आई कर्तव्याला प्राधान्य देते; मात्र जेव्हा आई बिझी असायची तेव्हा तिचे डॉक्टर वडील घरी असायचे, यामुळे आम्हाला बरे वाटायचे, असे नववीमध्ये शिकणारी राधिका म्हणाली. शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाला अन्य विद्यार्थ्यांचे आई-बाबा उपस्थित राहतात. आईही वेळ काढून येते, असे सांगे, मात्र अचानक तिला फोन येई आणि ती ड्यूटीला निघून जाई. घरी आल्यानंतर आईला रागावत असू. तेव्हा ती आमची समजूत काढत असे. आजच्या मुलाखतीदरम्यानही राधिकाने डॉ. मिसाळ यांना आमच्यापेक्षा तुला ड्यूटी महत्त्वाची वाटते का, असा सवाल केला. कोंडीत पकडणाºया या प्रश्नाचे उत्तर देताना मिसाळ म्हणाल्या की, मला तुमच्या एवढीच महत्त्वाची नोकरीही आहे, ती करावीच लागते. नोकरीमुळे आमच्यासाठी तू आवश्यक तेवढा वेळ देऊ शकत नाहीस, यामुळे तुला कधी नोकरी सोडावी वाटली का? या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. मिसाळ म्हणाल्या की, हा विचार मनातून काढून घर आणि संसार या दोन्ही बाबींना प्राधान्य देत पुढे जायचे मी ठरविले.
आई, आता आमच्यासाठी अधिक वेळ दे
नांदेड : मंगळवारी होणाºया बालदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक मनीषा कदम यांची त्यांच्या सहा वर्षीय प्रांजल आणि नऊ वर्षीय प्रचेता या मुलींनी मुलाखत घेतली़ यावेळी आई ,तुझ्या कामाचे स्वरूप आम्ही समजू शकतो़ मात्र आमच्यासाठी अधिक वेळ दे, अशी लडिवाळपणे विनंती केली़ प्रांजलने पोलीस निरीक्षक कदम यांना दररोज आॅफिसला जाणे आवश्यकच असते का, असा प्रश्न विचारला़ तर प्रचेताने दररोज कार्यालयात कशा पद्धतीने काम चालते, याबाबतची माहिती विचारली़
आई, कार्यालयात गेल्यानंतर बाबा आम्हाला वेळ देतात़ शाळेतील कार्यक्रमांनाही बाबांची आवर्जून उपस्थिती असते़ बाबांप्रमाणेच आता तूही आम्हाला वेळ दे, अशी या दोघींनी मागणी केली़ पोलीस म्हणून काम करताना भीती वाटत नाही का? भीती वाटल्यानंतर तू काय करतेस? असे प्रश्नही या चिमुकल्यांनी यावेळी आपल्या आईला विचारले़ पोलीस अधिकाºयाऐवजी इतर प्रकारची ड्यूटी असती तर आम्हाला जास्त वेळ दिला असता का, अशी गुगलीही या मुलींनी टाकली़ यावर पोलीस निरीक्षक कदम यांनी हो, (स्मितहास्य करीत) नक्कीच, दुसरी नोकरी असती तर तुमच्यासाठी मला अधिक वेळ देता आला असता़ टीव्हीवर आमच्या आवडीचे कार्टून शो पाहण्यास विरोध का करतेस? या प्रश्नावर कदम म्हणाल्या, शाळेतून घरी आल्यानंतर तुम्ही तुमचा गृहपाठ वेळीच केल्यानंतर काही वेळासाठी तुम्हाला कार्टून शो पाहायला काहीच हरकत नाही़, असे त्यांनी मुलींना सांगितले. मोबाईलवर गेम खेळण्यासही तू विरोध का करतेस, या प्रश्नावर कदम म्हणाल्या, मोबाइलवर अनेक महत्त्वाचे फोन येत असतात़ लहान मुलांनी मोबाइलवर अधिक वेळ असणे, हे त्यांच्याच आरोग्यासाठी घातक असते, अशी त्यांनी आपल्या चिमुकल्या मुलींची समजूतही घातली़
रुग्णसेवेबरोबर नात्यातील ओलावा जपण्याची कसरत
औरंगाबाद : ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ हे ब्रीद घेऊन रुग्णांसाठी अहोरात्र झटणाºया डॉक्टरांना कुटुंबियांना पुरेसा वेळ देता येत नाही. विशेषत: आपल्या चिमुकल्यांना हवा असलेला वेळ, त्यांच्या आवडी-निवडी विचारता येत नाहीत, याची खंत कुठेतरी सतत मनाला बोचत असते. तरीही रुग्णसेवेचे व्रत जोपासताना एक पिता म्हणून नात्यातील ओलावा आणि आपुलकी जपण्याची कसरत होते. चिमुकलीने विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना डॉक्टर पित्याने हा सारा भावनिक उलगडा केला.
मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांची जीवनवाहिनी म्हणून घाटी रुग्णालयाची ओळख आहे. घाटीतील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग हा सर्वाधिक व्यस्त राहणारा आणि सर्वाधिक रुग्णसंख्या असणारा विभाग आहे. याठिकाणी दररोज सुमारे ७० ते ८० प्रसूती होतात. याठिकाणी विभागप्रमुख म्हणून डॉ. श्रीनिवास गडप्पा रुग्णसेवेसाठी सतत दक्ष असतात. सकाळी ९ वाजेपासून सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत रुग्णालयातच असतात. परंतु एवढ्या वेळेतच त्यांचे कर्तव्य संपत नाही. या वेळेनंतरही त्यांना रात्री-अपरात्री रुग्णालयात उपस्थित राहावे लागले. पत्नी, मुलगा-मुलगी असे त्यांचे कुटुंब. परंतु आधी रुग्णसेवा आणि नंतर परिवार, अशी त्यांची स्थिती आहे. त्यांची १३ वर्षांची मुलगी वेदिका ही आठवीत शिकते. गोरगरीब रुग्णांसाठी सतत बिझी राहणाºया वडिलांच्या कर्तव्याची, त्यांच्या रुग्णसेवेच्या व्रताची तिला जाणीव आहे. परंतु तिच्या मनात असंख्य प्रश्न घोंगावत असतात. बालदिनानिमित्त चिमुकलीने विचारलेल्या प्रश्नांना डॉ. गडप्पा यांनीही मनमोकळेपणाने उत्तरे देऊन रुग्णसेवा कुटुंब आणि मुलांप्रती असलेल्या जबाबदारीचा प्रवास उलगडला. एक डॉक्टर पिता आणि मुलीमध्ये झालेला हा संवाद.
वेदिका : एक बिझी पालक म्हणून कोणत्या आव्हानांना सामोरे गेलात?डॉ. गडप्पा : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात काम करताना अनेक जबाबदाºया पार पाडाव्या लागतात. गोरगरीब रुग्णांची संख्या अधिक आहे. अनेकदा आपत्कालीन परिस्थिती असते. या सगळ्यात तुझ्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. तुझा अभ्यास विचारू शकत नाही. वेदिका : एक पालक म्हणून नकोसा झालेला दिवस कोणता?डॉ. गडप्पा : पालक म्हणून कोणताही दिवस नकोसा झालेला नाही. घरी आल्यानंतर तुला पाहिल्यानंतर दिवसभराचा थकवा, क्षीण क्षणात निघून जातो. वेदिका : बिझी शेड्यूलमधून मला वेळ देता आला तर काय कराल?डॉ. गडप्पा : तुझ्यासोबत भरपूर वेळ थांबता येईल. खूप खूप गप्पा मारता येतील. तुझ्या आवडी-निवडी विचारता येतील. तुझे अक्षर कसे आहे, हे पाहता येईल. त्यात आणखी सुधारणा करता येईल. एकत्र बसून जेवणही करता येईल.वेदिका : बिझी पालक म्हणून मुलांनी स्वतंत्र राहावे, असे वाटते का?डॉ. गडप्पा : पालक म्हणून तुमच्या जडणघडणीमध्ये आमचाही सहभाग हवा. त्याचा आम्हालाही आनंद मिळेल. शिवाय तुम्हालाही उंच भरारी घेता येईल. रुग्णांच्या चेह-यावरील स्मितहास्य हे सगळ्यात आनंदी वाटते.
बेटा, माफ कर ! मी एसटीचा ड्रायव्हर...
बीड : तुमच्या शिक्षणासाठीच रात्रंदिवस डोळे फोडावे लागतात...तुमच्याकडे बघूनच मला बस चालवावी लागते...दोन दिवस घरी राहिलो तर पगार होईल का ? रजा मंजूर होईल का ? तुमच्यासाठी करताना मला ओव्हरटाईम करावा वाटतो... तरीही आपली परिस्थिती नाही, आपण मोठे नाहीत. बेटा, माफ कर ! मी एसटीचा ड्रायव्हर आहे. पण मला तू डॉक्टर, इंजिनिअर, मोठा अधिकारी व्हावं असं वाटतं. मी खर्च भागवू शकत नाही. अशी विदारकता राज्य परिवहन महामंडळात चालक म्हणून सेवा करणारे रमेश रामभाऊ कानडे यांनी त्यांचा मुलगा रोहितसमोर मांडली.बालदिनाच्या पार्श्वभूमीवर लोकमत कार्यालयात रोहितने त्याच्या वडिलांची मुलाखत घेतली.
तुला ठाऊक आहे का ? दहावी नापास झाल्यामुळे रागारागाने पुण्याला गेला. तेथे पाहुण्याच्या गाडी क्लिनर म्हणून काम करीत होतो. कुल्फीच्या गाड्यावर झोपायचो, वडापाव खाऊन दिवस काढले. आई-वडिलांचे पत्र आले तर ढसाढसा रडायचो. १३ वर्षांपासून एसटीमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतो. मुक्कामी गेल्यानंतर घराची काळजी लागलेलीच असते. फोनकरुन ख्याली खुशाली विचारत असतो तरीही भीती असतेच. ड्युटीला गेल्यावर बाहेर कसे राहता हा प्रश्न रोहितने विचारल्यानंतर तुमच्या शिक्षणासाठीच मला काम करावे लागते. पैशाची टंचाई आहे. तुलाही माहित आहे. घरुन ताजं घेऊन जातो. संध्याकाळी शिळं खावं लागते. आंघोळीची, राहण्याची सोय नसते. डासांचा त्रास असतो, पांघरायला आपलेच असते. १६ तास ड्युटी करताना थकवा येतो. थंडी, वा-यामुळे आजारी पडतो. ओव्हरटाईम मिळतो, पण भागत नाही हे तुलाही माहीत आहे.
ड्युटीच्या वेळी २५ टक्के प्रवासीच चांगले वागतात. प्रवासादरम्यान काही झाले तर लवकर मदत मिळत नाही. बाजूने कोणी बोलत नाही. त्यावेळी घरच्यांची आठवण येते. सगळ्या अडचणींमुळे तणाव असतानाही डोकं शांत ठेवत आम्हाला बस चालवावी लागते. तुमच्याकडेच पाहूनच बस चालवावी लागते. तणाव घेतला तर नजरचुकीने काहीही होईल. मान, पाठ, गुडघे दुखतात. इच्छा नसताना ड्युटी करावी लागते. मला माझ्या जीवाची भीती नसते. तुमच्यासाठीच हे करतो. बाबा तुम्ही घर का बांधत नाहीत असा सवाल रोहितने विचारल्यानंतर बाळं, एसटीच्या पगारात आपण घर बांधू शकत नाही हे ते पाहतोस.
संपावर गेल्यामुळे पगार कापणार हे खरं की खोटं तू विचारलं होतं. पगार कधी होणार ते माझ्या हातात नसते. दोन दिवसं थांब, शिकवणीचे पैसे देऊन टाकू. नको ती मागणी आणि हट्ट करु नका. माझ्याशी भांडू नका, माझी चिडचिड होते. तुम्हाला कळले पाहिजे, तुम्ही शांत बसावं. ड्युटीवरुन आल्यानंतर टेन्शन देऊ नये. हे आणले का, ते आणले का विचारु नये. मी परिस्थितीशी संघर्ष करतोय. परंतु तुमचे लाड पुरवू शकत नाही. आपल्याला मिळते त्यातच भागवावे लागेल.