औरंगाबाद : कारला धक्का लागला म्हणून राग अनावर झालेल्या सहायक पोलिस निरीक्षकाने रिक्षा चालकास भररस्त्यात अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना आज शहरात घडली. गुंडालाही शोभणार नाही अशा भाषेत पोलीस निरीक्षकाची शिवीगाळ आणि मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
कारने जात असताना सहायक पोलीस निरीक्षक राजेश मायेकर यांनी काही कारणास्तव ब्रेक दाबला. यावेळी त्यांच्या पाठीमागे असलेल्या रिक्षाचा कारला धक्का लागला. लागलीच मायेकर खाली उतरले. मागे येऊन कारचे नुकसान झाल्याचे पाहताच त्यांच्या रागाचा पारा चढला. भर रस्त्यात रिक्षाचालकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. पुढे जाऊन त्या रिक्षाचालकाच्या रिक्षाची चावी काढून घेत त्याला पोलीस स्टेशनला येण्याचे सांगत तेथून निघाले. रिक्षाचालक माफ करा चूक झाली म्हणत त्यांच्या मागे आला. मात्र, संतापलेल्या मायेकर यांनी एक न जुमानता त्याला लोटून देत आणखी शिवीगाळ केली. मारहाण करत त्याला पोलीस स्टेशनाल ये असे वारंवार बजावले.
नुकसान भरपाई देतो, चावी द्यावी कारला झालेल्या नुकसानीची भरपाई देतो, चावी द्या अशी वारंवार विनवणी चालकाने केली. पण पोलीस निरीक्षक मायेकर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. संबंधित घटना घडत असताना बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी जमा झाली. काहींनी याचा व्हिडिओ चित्रित केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर व्हायरल झाला असून नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.