औरंगाबाद : उद्योगांच्या पाणी कपातीमुळे जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ८० लाख लिटर पाण्याची दररोज बचत होत आहे. मराठवाड्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना जायकवाडी धरणाच्या पाण्याचा मद्य व बीअर निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. ‘लोकमत’ने वृत्तमालिकेद्वारे यावर प्रकाशझोत टाकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर मद्यनिर्मिती उद्योगांसाठी ६० टक्के, तर इतर उद्योगांसाठी २५ टक्के पाणी कपात करण्याचे आदेश खंडपीठाने २६ एप्रिल रोजी दिले होते. उद्योगांच्या पाणी कपातीच्या निर्णयाची २७ एप्रिलपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली. पाणी कपातीवर देखरेख करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एका विशेष समितीची नियुक्ती केली होती. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) कार्यकारी अभियंता राजेंद्र गावडे, राहुल तिडके, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय भर्गोदेव यांचा या समितीत समावेश आहे. चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अॅण्ड असोसिएशनच्या (सीएमआयए) कार्यालयात शनिवारी या समितीने उद्योगांच्या प्रतिनिधींची विशेष बैठक घेऊन पाणी कपातीच्या निर्णयावर चर्चा केली.
८० लाख लिटर पाण्याची दररोज बचत
By admin | Published: May 03, 2016 12:42 AM