औरंगाबाद : ल.बा.रायमाने यांनी त्या काळात मिलिंद महाविद्यालयामध्ये भित्तीपत्रक चळवळीत पुढे वेगाने वाढलेल्या दलित साहित्य चळवळीची क्रांती बीजे सापडतात. राष्ट्रसेवा मूलाचे संस्कार घेऊन आलेल्या ल. बा. रायमाने यांनी संवादक म्हणून उत्कृष्ट भूमिका बजावली. हळूहळू संपुष्टात येत चाललेली संवादकाची भूमिका नेटाने पुढे नेणे हीच रायमाने यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात गुरुवारी येथे आदरांजली व्यक्त करण्यात आली.
वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या सभागृहात प्राचार्य राजाराम राठोड यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा झाली.
प्राचार्य डॉ. इंद्रजित आल्टे म्हणाले, काळ खूप कठीण आलाय, असे रायमाने नेहमी म्हणत असत. त्यांच्यावर बुद्ध, फुले, शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणेच महात्मा बसवेश्वर, राम मनोहर लोहिया, साने गुरुजी आणि राष्ट्र सेवा दलाचा प्रभाव होता. त्यांच्यात नैतिकता होती. साने गुरुजींचा करुणाभाव त्यांच्यात होता. अत्यंत पोटतिडकीने हे व्यक्त होत होते. एकदा खुलले की त्यांच्यातील रसिक जागा होत असे. ते एक अजब रसायन होते.
डॉ. संजय मून यांनी रायमाने यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. कोरोनामुळे परिवर्तनवादी चळवळींचे अधिक नुकसान होत आहे. लोकशाहीतला चळवळींचा म्हणून जो आकृतीबंध असतो, तोच कोरोनामुळे नाहीसा होत चालल्याबद्दलची चिंता मून यांनी व्यक्त केली.
खादीच्या पेहरावातील रायमाने यांची मिलिंद महाविद्यालयातील एन्ट्री त्यावेळी चर्चेचा विषय राहिला. मनी वसलेल्या नम्रतेने ताठपणे उभे राहत गेले. मूल्यांची निष्ठा त्यांनी कधी सोडली नाही,असे सांगून डॉ. मून म्हणाले, मिलिंद साहित्य परिषदेची चळवळ पुन्हा सुरू करून रायमाने सरांना अंडरलाईन गेल्यास हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.
साथी सुभाष लोमटे यांनी सध्या देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या अनुषंगाने मांडणी करत रायमाने यांना श्रद्धांजली अर्पण केली.
प्रारंभी ल. बा. रायमाने यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर संयोजक के.ई.हरिदास यांनी प्रास्ताविक केले. प्राध्यापक भारत शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले. राहुल इंगळे यांनी आभार मानले.