लोकमत न्यूज नेटवर्क
केळगाव : केळगाव हा डोंगराळ व जलयुक्त परिसर आहे. त्यामुळे याठिकाणी वन्य प्राण्यांचा संचार मोठ्या प्रमाणात असतो. गेल्या काही महिन्यांपासून वन्य प्राण्यांकडून सातत्याने शेतपिकाचे नुकसान होत असल्याने येथील शेतकरी त्रस्त झाले आहेत. पिकांची आणि पाळीव प्राण्यांची भरपाई शासनाकडून शेतकऱ्यांना मिळते. मात्र, गेल्या नऊ महिन्यांपासून शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. विशेष म्हणजे वन विभागाच्या कार्यालयात याबाबत शेतकऱ्यांनी पाठपुरावादेखील केलेला नाही.
अजिंठा डोंगर रांगेत असलेले मुडैश्वर, केळगाव, कोल्हाळा तांडा, आधरवाडी, गोकुळवाडी जंगलात बिबट्या, तडस, लांडगे यासह अनेक वन्यप्राणी मोठ्या संख्येने आहेत. हे वन्यप्राणी जंगलाला लागून असलेल्या गावातील शेतशिवारात मुक्त संचार करत असतात. हे प्राणी बैल, गाय, शेळ्या, मेंढ्या, म्हशी यांच्यावरही हल्ले करतात.
केळगाव परिसरातील जंगलात नीलगाई, हरिणी, काळवीट, कोल्हे यासह अन्य प्राण्यांच्या कळपांनी शेकडो एकर जमिनीवरील मका, कपाशी, मिरची, तूर, उडीद, मूग, सोयाबीन पिकांचे नुकसान केले आहे. यासाठी शासनाकडून पिकांची नुकसानभरपाई दिली जाते. मात्र, ही मदत गत नऊ महिन्यांपासून मिळालेली नाही. त्यात जीवाचे रान करून शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री वन्यप्राण्यांचा सामना करत शेतात पहारा करावा लागतो. ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता, शेतकरी आपल्या पिकांची राखण करतात.
काय म्हणतात शेतकरी...!
रात्रंदिवस बॅटरी घेऊन शेतात थांबावे लागते
माझ्या शेतात लागवड केलेल्या मका पिकाचे वन्यप्राणी कुरतडून मोठे नुकसान करत आहेत. गतवर्षी पावसामुळे आम्हा शेतकर्यांचे कंबरडे मोडले होते. त्यात आणखी समस्या वाढली असून, वन्य प्राण्यांचा हैदोस वाढला आहे. वन विभागाकडून या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी आहे. गेल्यावेळी झालेल्या नुकसानाची भरपाई अजूनही मिळालेली नाही,
- ज्ञानेश्वर शेळके, शेतकरी, केळगाव
-------------
अजिंठा परिसरातील वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व पशुधनाचे नुकसान होते. या नुकसानापोटी वन विभागाकडून मदत मिळते. संबंधित घटनास्थळांचे पंचनामे करून त्यासंबंधीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविलेला आहे. वारंवार पाठपुरावा सुरू आहे. निधी प्राप्त होताच शेतकऱ्यांना मिळेल.
- एस. पी. मांगदरे, वन परिक्षेत्र अधिकारी, अजिंठा.