भिलदरी तलाव फुटला : पंचनामे करण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश
औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील महसूल मंडळापैकी ७ मंडळांत अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले. जिल्ह्यातील इतर ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याची माहिती मागविल्याचेही त्यांनी सांगितले.
नागद, सायगव्हाण, भिलदरी येथील भागातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करुन जिल्हाधिका-यांनी शेतक-यांशी संवाद साधला. पिशोर परिसरातील नाल्यांवर लोकांनी केलेल्या बांधकामामुळे नाल्याचे घाण पाणी वसाहतींमध्ये साचत आहे. ग्रामस्थांना त्याचा त्रास होत असून त्या अनधिकृत बांधकामाची चौकशी करुन ते हटविण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.
भिलदरी तलाव फुटला; शेतात शिरले पाणी
कन्नड तालुक्यातील भिलदरी तलाव फुटल्याने भोवतालच्या शेतातील पिके उद् ध्वस्त झाली. शेतक-यांच्या भेटी घेत जिल्हाधिका-यांनी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. नुकसानीचे गावनिहाय पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. तसेच नागद येथील दुकानांची पाहणी केली. घरात पाणी शिरले अशा परिवारांची भेट घेत वस्तुस्थिती जाणून घेतली. पंचनाम्यांचे आदेश काढले असून लवकर मदत पोहोचवू, असे जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले.
महसूल राज्यमंत्र्यांनी केली पाहणी
सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील कन्नड, सोयगाव तर जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला बसला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवारी दिले.