कन्नड व लासूर परिसरात झालेल्या पावसाने शिवना नदीला २० वर्षांनंतर पूर आला होता. यामुळे देवी दाक्षायणी मंदिराला पाण्याचा वेढा पडून फरशी पूल पाण्याखाली आहे. नागपूर-मुंबई महामार्गावरील पुलावरवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक प्रभावित झाली होती. गंगापूर-लासूर हा मार्ग वाहतुकीसाठी बुधवारी दिवसभर बंद करण्यात आला होता. शहाजपूर, शिरजगाव, बोलेगाव, बाबरगाव येथील कोल्हापुरी बंधाऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदीकाठच्या गावांत व शिवारात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. तर पुरामुळे पिंपळवाडी गावाचा संपर्क तुटला होता. नरसापूर-सारंगपूर गावाचा संपर्कही तुटला होता.
अंबेलोहळ, तुर्कांबाद व वाळूज परिसरात झालेल्या जोरदार पावसाने टेंभापुरी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला आहे. लिंबे जळगाव येथील शनी मंदिराला पाणी लागले आहे. धरण क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून धामोरी बु. येथील नागझरी नदीला व शेंदुरवादा येथील खांब नदीला पूर आल्याने परिसरातील अनेक गावांत पाणी शिरले होते. शेंदुरवादा येथील प्रसिद्ध शेंदुरात्मक हे गणपती मंदिर काही काळ पाण्यात होते. कायगाव भागात जोरदार पाऊस झाल्याने लखमापूर, गणेशवाडी, अंमळनेर, अगरवाडगाव, भेंडाळा, भिवधानोरा, धनगरपट्टी शिवारात सोयाबीन पिकात पाणी तुंबले असून उसांचे पीक आडवे झाले आहे. तालुक्यात दिवसभरात एकूण ६२६ मि.मी पावसाची नोंद झाली असून डोणगाव मंडळात सर्वांत कमी म्हणजे ४१ मि. मी. तर सर्वाधिक तुर्काबाद मंडळात १२८ मि. मी. पाऊस पडला आहे.
080921\20210908_093333.jpg
गंगापूर : शिवना नदीला आलेल्या महापुरामुळे मालूंजा येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने लासुर व गंगापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता