---
नीलेश गटणे : एनडीआरएफच्या निकषानुसार ९ कोटी ९० लाखांचे नुकसान
---
औरंगाबाद : जिल्ह्यात ७ आणि ८ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषदेने मालमत्ता नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेतला. यात विविध विभागांतील २४५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यापैकी एनडीआरएफच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ९ कोटी ९० लाखांची नुकसान भरपाई विचारात घेतली जाईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी सांगितले.
नुकसानीबाबतच्या प्राथमिक आकडेवारीनुसार पाणीपुरवठा विभागाचे कन्नड तालुक्यातील ग्रामपंचायत साई गव्हाण, नागद, देभेगाव व करंजखेडा या चार योजनांचे १७.५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील १४४ ग्रामपंचायतींच्या इमारतीचे १७.२८ कोटी, तर इतर ९८ इमारतींचे ११.७६ कोटी असे एकूण २४२ इमारतींचे २९.०४ कोटींचे नुकसान झाले आहे.
बांधकाम विभागाच्या अखत्यारितील ६ हजार ६५५ किलोमीटर रस्त्यांपैकी ६४३ किलोमीटर रस्त्यांचे व पुलांचे २११.४७ कोटींचे नुकसान झालेले आहेत. त्यापैकी तातडीने रस्ते दुरुस्तीसाठी ९ कोटी ६४ लाख रुपयांची आवश्यकता भासणार आहे. आरोग्य विभागाच्या ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे १२.५ लाखांचे नुकसान झाले. तर सिंचन विभागाचे २० बंधाऱ्यांचे पावसाच्या पाण्यात ९ कोटी १९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती गटणे यांनी दिली. ही प्राथमिक आकडेवारी आहे. सर्व विभागांना नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले असून त्यासंबंधीची अधिकृत आकडेवारी येण्यास काही दिवसांचा अवधी लागणार आहे.