चिकलठाणा परिसरातील मोतीवाला कॉलनीत १८ ते १९ वर्षांची तरुणी बसलेली आहे. तिच्या अंगावरील कपडे फाटलेले असून, दोन्ही हातांवर मेंदी लावलेली आहे. ती कुणालाही बोलत नाही, अशी माहिती दामिनी पथकाला सोमवारी सकाळी मिळाली. पोलीस उपनिरीक्षक उमाप, हवालदार निर्मला निंभोरे आणि पथकाने तेथे जाऊन नागरिकांच्या मदतीने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती बोलत नव्हती. तिच्या अंगावरील कपडे फाटलेले असल्याने पथकाने तिला गाडीत बसवून तिला नवीन ड्रेस नेसायला दिला. यानंतर तिची विचारपूस केली. मात्र, ती फारसे बोलत नव्हती. तिला तिचे नाव, गाव आणि पत्ता सांगता येत नव्हता. आई- वडील इच्छेविरोधात लग्न लावणार होते, म्हणून पळून आल्याचे ती सांगत होती. मात्र, अधिक बोलत नसल्याने पथकाने तिला एमआयडीसी सिडको पोलिसांच्या ताब्यात दिले. एमआयडीसी सिडको पोलिसांनी तिला महिलागृहात ठेवले. न्यायालयाच्या आदेशाने तिच्यावर मनोरुग्णालयात दाखल केले जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी सांगितले.
भोळसर तरुणीच्या मदतीसाठी धावले दामिनी पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 4:05 AM