छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या पैठणच्या जायकवाडीसह दहा मोठे प्रकल्प, ७६ मध्यम प्रकल्प आणि ७५० लघू धरणांतील साठा झपाट्याने घटत असून अर्ध्याहून अधिक लघू प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईची दाहकता वाढणार आहे.
गतवर्षी मराठवाड्यात अत्यल्प आणि रिमझिम पाऊस पडला. यामुळे खरीप पिकांचे उत्पादन ४० टक्क्यांहून कमी झाले आहे, असा अहवालच कृषी विभागाने शासनास पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले. गतवर्षी मुसळधार पावसाअभावी नदी-नाल्यांना पूर गेला नाही. परिणामी मराठवाड्यातील नांदेड जिल्हा वगळता अन्य धरणांतील जलसाठा वाढला नाही. मराठवाड्यातील जनतेला जनआंदोलन उभारून नाशिक आणि नगरकरांनी अडवून धरलेले ८ टीएमसी पाणी मिळवावे लागले होते. त्यामुळे आज जायकवाडी प्रकल्पात केवळ ३४ टक्के जलसाठा उरला आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण येथील एमआयडीसी आणि या शहरांतील जलयोजना याच प्रकल्पावर आहेत. यासोबतच जवळपास ४०हून अधिक ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना जायकवाडी धरणावरच अवलंबून आहेत.
मराठवाड्यातील ७६ मध्यम प्रकल्पांत आज केवळ १८ टक्के जलसाठा उरला आहे. यातील ३७ मध्यम प्रकल्पांत आजचा जलसाठा ९ टक्क्यांपेक्षा कमी आहे. मराठवाड्यातील ७५० लघू प्रकल्पांत १९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यातील निम्म्याहून अधिक धरणे कोरडी पडलेली आहेत. उर्वरित धरणांतील जलसाठाही येत्या दोन महिन्यांत तळ गाठण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील ३०६ गावे तहानलेलीमराठवाड्यातील ग्रामीण भागात जलस्रोत आटल्याने आजच्या दिवशी ३६५ गावांत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे महसूल प्रशासनाने खासगी आणि सरकारी अशा २७८ टँकर्सद्वारे या गावांना पाणीपुरवठा सुरू केला. विभागातील विविध जिल्ह्यांत २१८ गावांतील खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले.
पाण्याचा वापर काटकसरीने करामराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पासह अन्य मध्यम आणि लघू प्रकल्पांतील जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. आगामी चार महिने कडक उन्हाळ्याचे आहेत. यामुळे या कालावधीत पाण्याची मागणी वाढणार आहे, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आजपासूनच पाण्याचा वापर काटकसरीने करावा.- जयंत गवळी, मुख्य अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा)