औरंगाबाद : भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी कन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव यांच्या वक्तव्यावर मौन बाळगले, तर राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या निवडणूक लढण्याच्या आव्हानावर त्यांनी काहीही प्रतिक्रिया न देता मिश्कील हास्य करीत विभागीय आयुक्तालयातून काढता पाय घेतला.
कन्नडचे शिवसेना आ. जाधव यांची वंचित बहुजन आघाडीशी जवळीक वाढू लागल्यामुळे त्यांना त्यांचे सासरे खा. दानवे हेच समजावून सांगतील, असा दावा खा. खैरे यांनी केला होता. शुक्रवारी २३ फेबु्रवारी रोजी शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे यांना प्रत्युत्तर देताना आ. हर्षवर्धन जाधव म्हणाले होते, माझ्या सासऱ्यांनी सांगितले तर खैरेंची उमेदवारी निश्चितपणे कापली जाईल.
सेनेतील दोन लोकप्रतिनिधींच्या हमरीतुमरीत भाजपचे खा. दानवे केंद्रस्थानी आल्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना खा. दानवे यांनी याप्रकरणात काहीही उत्तर दिले नाही. जालन्याचे आ. अर्जुन खोतकर हे काँग्रेसकडून लढणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. खोतकर लढले तर ते आव्हान उभे करतील काय? यावरही खा. दानवे यांनी इकडच्या-तिकडच्या गप्पांवर चर्चा करीत वेळ मारून नेत मिश्कील हास्य केले; परंतु थेट उत्तर दिले नाही.
आयुक्तांशी तासभर चर्चाविभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यासोबत खा. दानवे यांनी सोमवारी तासभर चर्चा केली. मतदारसंघातील रखडलेल्या कामांबाबत भेट घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. आयुक्त तातडीने मुंबईला गेल्यामुळे माध्यम प्रतिनिधींची त्यांच्याशी भेट होऊ शकली नाही. निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता तोंडावर आलेली असताना दोन्ही उभयंतांमध्ये तासभर झालेली चर्चा बाहेर बसलेल्या अभ्यागतांमध्ये चर्चेचा विषय ठरली.