औरंंगाबाद : सकाळी ११ वाजेची परवानगी असताना दुपारी पावणेतीन वाजता मोर्चा काढून तसेच मनाई केलेली असताना दंडुके, बैलगाडी, रेडा आणून परवानगी देताना घालून दिलेल्या अटींचा भंग केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाºयांविरोधात क्रांतीचौक आणि सिटीचौक पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे नोंदविले.मनविसेनेचे जिल्हाध्यक्ष राजीव हरिश्चंद्र जावळीकर, जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, संदीप देशपांडे, जावेद शेख, संदीप कुलकर्णी आणि अमोल खडसे अशी गुन्हा नोंद झालेल्या दंडुका मोर्चा संयोजकांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मंगळवारी औरंगाबादेतील क्रांतीचौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा दंडुका मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला शहर विभागाचे सहायक पोलीस आयुक्तांनी अटी आणि शर्ती घालून परवानगी दिली होती. या मोर्चाची वेळ सकाळी ११ वाजता निर्धारित करण्यात आली होती, असे असताना मोर्चाला दुपारी पावणेदोन वाजता सुरुवात करण्यात आली. या मोर्चात कोणत्याही प्रकारे दंडुके, बैलगाडी अथवा अन्य पशू,प्राणी आणि अन्य प्रतिबंधित वस्तू आणण्यास मनाई करण्यात आली होती, असे असताना मोर्चेकरी आणि संयोजक पदाधिकाºयांनी दंडुके, बैलगाडी आणि रेड्याचे (हेला) प्रदर्शन करून सरकारचे लक्ष वेधले होते. मोर्चाला देण्यात आलेल्या मार्गाऐवजी सराफा, शहागंज, चेलीपुरा, अण्णाभाऊ साठे चौक मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर या मार्गाने मोर्चा नेण्यात आल्याने ऐनवेळी पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. अटीचा भंग करून मोर्चा नेल्याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात पोलीस शिपाई चंद्रकांत कचरू चंदेल यांनी सरकारतर्फे मोर्चाच्या संयोजकांविरोधात फिर्याद नोंदविली, तर क्रांतीचौक ठाण्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक कचरू रामराव निकम यांनी सरकार पक्षातर्फे तक्रार नोंदविली. या दोन्ही तक्रारींप्रकरणी अनुक्रमे सिटीचौक आणि क्रांतीचौक ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.
दंडुका मोर्चा उशिरा काढला, अटींचा भंग केला, मनसेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात पोलिसांनी नोंदविले गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:30 AM