- विकास राऊत
औरंगाबाद : मराठवाड्यावर मागील दोन वर्षांपासून पावसाळ्यात काही मंडळांत, भागांमध्येच काही मिनिटांत वेगाने पाऊस पडण्याचे प्रमाण वाढले आहे. ढगफुटीचा हा प्रकार आहे की नाही, याबाबत हवामान खात्यांत वेगवेगळे मतप्रवाह असले तरी वेगाने पाऊस पडून जनजीवन विस्कळीत होत आहे. सध्या लातूर, नांदेड, परभणी, हिंगोलीत पावसाचे प्रमाण चांगले आहे. नांदेडमध्ये विष्णुपुरी प्रकल्प परिसरात वारंवार पाऊस होतो आहे. परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील काही मंडळांत जास्तीचा पाऊस होऊन अतिवृष्टीची नोंद होत आहे.
गेल्या महिन्यात ७ जून रोजी जालन्यातील भोकरदन तालुक्यातील वाकडी- आसडी गावात दुपारी ३ वाजेच्या सुमारास झालेल्या पावसाने पूल वाहून गेला. ९ जून रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात गोळेगाव येथे वाकडीपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर दुपारी वेगाने पाऊस झाला. १६ जुलै रोजी औरंगाबाद शहरात ८ मिनिटांत २१ मि.मी. पाऊस झाला. गेल्यावर्षी २४ जुलै रोजी ४० मिनिटांत ७१ मि.मी. पाऊस औरंगाबाद शहरात झाल्याची नोंद आहे. हा सगळा प्रकार होत असताना हवामान विभाग हा प्रकार ढगफुटी नसून तो ‘अतिवृष्टी’ असल्याचे वारंवार सांगत आहे. एका दिवसात ६५ मिलीमीटरपेक्षा जास्त होणाऱ्या प्रत्येक पावसाला हवामान विभाग अतिवृष्टी किंवा महावृष्टी म्हणते. दररोज किंवा चोवीस तास असा पाऊस होत नसल्याचे हवामानतज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.
पावसाचे मापकशासकीय नियमाप्रमाणे एकाच दिवशी अथवा ठरावीक काळात ६५ मि.मी. पाऊस झाला, तर त्याला अतिवृष्टी झाल्याचे निकष लागू होतात. ६५ मिलीमीटरपेक्षा पाऊस म्हणजे जास्त पाऊस (हेवी रेन), ६५ ते १२५ मिलीमीटरपेक्षा पाऊस म्हणजे खूप जास्त पाऊस (व्हेरी हेवी रेन), तर २५० मिलीमीटरपेक्षा पाऊस म्हणजे अत्यंत जास्त पाऊस (एक्सट्रिमली हेवी रेन), असे मापक हवामान खाते वापरते. यामध्ये ढगफुटीचा प्रकार किती मिलीमीटरसाठी गृहीत धरावा, हे हवामान खाते स्पष्ट करीत नाही, असेही प्रा. किरणकुमार जोहरे म्हणाले.
काँक्रिटीकरण आणि वृक्षतोडीमुळे हा प्रकारहवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले, वृक्षतोड, सिमेंट काँक्रीटचे रस्ते आणि शहरीकरणामुळे मराठवाड्यातील शहरी भागांत सायंकाळच्या सुमारास वेगाने पाऊस पडण्याचे प्रमाण वाढते आहे. १६ जुलै रोजी शहरातील काही मंडळांत १११ मि.मी. ताशी वेगाने पाऊस झाला. ८ मिनिटांत २१ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे दिसले, तर गांधेली परिसरात १२ मि.मी. नोंद झाली. फुलंब्रीत २, तर पैठणमध्ये ७ मि.मी. पावसाची नोंद झाली. याचा अर्थ शहरी भागातच हे प्रमाण वाढू लागले आहे. एका तासात १०० मिलीमीटरच्या वर म्हणजेच ४ इंच पाऊस झाला, तर त्याला ढगफुटी म्हणता येईल. मराठवाड्यात काही भागात असा पाऊस होण्याचे प्रमाण वाढते आहे.