औरंगाबाद : शहरात शासकीय तसेच विविध खासगी रुग्णालयात एकूण १९३८ सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात सर्वाधिक २९० रुग्ण मेल्ट्रॉन रुग्णालयात दाखल असून त्यापाठोपाठ किलेअर्क येथील कोविड केअर सेंटरमध्ये २६८ तर घाटी रुग्णालयात १९४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शहरातही कोरोनाचा नवीन स्ट्रेन येण्याचा धोका असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने बाहेरील शहरांतून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळ व रेल्वेस्टेशनवर कोरोना चाचणी सुरू केली आहे. रविवारी मनपा हद्दीत २०४, शनिवारी २३९ रुग्ण आढळून आले. त्यापूर्वी रुग्णांचा आकडा दररोज २७० ते २८० पर्यंत जात होता. आता प्रशासनाला थोडासा दिलासा मिळाला आहे. दिवसा संचारबंदी लावण्यासंदर्भात प्रशासनाचा अद्याप कोणताही विचार नाही. शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. विनामास्क वावरणाऱ्यावर कारवाई केली जात आहे. कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या कोचिंग क्लासेस, मंगल कार्यालये, हॉटेल, रेस्टॉरंटवर देखील महापालिकेच्या पथकांची करडी नजर असून गर्दी आढळल्यास कारवाई देखील केली जात आहे.
मात्र शहरातील नागरिक काही नियमांचे पालन करताना दिसून येत नसल्याने संसर्ग वाढतच चालला आहे. महापालिकेकडून रविवारी प्राप्त अहवालानुसार शहरात आजघडीला शासकीय तसेच विविध खासगी रुग्णालयांत १९३८ कोरोना रुग्ण दाखल झाले आहेत. यापैकी सर्वाधिक २९० रुग्णांवर चिकलठाणा येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किलेअर्क कोविड सेंटर येथे २६८, घाटीत १९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापाठोपाठ एमजीएममध्ये १६३, सिव्हिल रुग्णालयात १५३, एमआयटी सेंटरमध्ये ११९, एमजीएम स्पोर्टसमध्ये ९२, मेडिकव्हरमध्ये ८३, हेगडेवार हॉस्पिटलमध्ये ७९, धूत रुग्णालयात ७३ तर इओसी पदमपुऱ्यात ६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.