बाजारसावंगी : बाजारसावंगी- माटरगांव ते सुलतानपूर या मार्गावरील गिरीजा नदीवर असलेल्या पुलाची दुरावस्ता झाली आहे. पंधरावर्षांपुर्वी पुलाची उभारणी करण्यात आली होती. मात्र, काही वर्षांमध्ये त्याची वाट लागली आहे. जागोजागी ख़ड्डे असून अपघात होण्याची भिती निर्माण झाली आहे. अनेक वेळा नागरिकांनी दुरुस्तीची मागणी करुनही बांधकाम दुर्लक्ष करीत आहेत.
गिरिजा मध्यम प्रकल्पाचे पाणी सध्या पुलाच्या खालोखाल आहे. या पुलास कठडे नसल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली गेली आहे. या पुलावरील स्लबला जागोजागी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी गज बाहेर आलेले आहेत. वाहने पुलावरून जाताना पुल हलत असल्याचे वाहधारकांना जाणवते. त्यामुळे येथे मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अभियंत्यांना या बाबतीत विचारणा केली. त्यांनीही हा पुल आमच्या अखत्यारीत येत नसल्याचे सांगितले. परिणामी हा पुलाचा नेमका वाली कोण आहे. एकाद्या दिवशी मोठी दुर्घटना घडल्यावर प्रशासन झोपेतून जागे होणार आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
रस्तेही खराब
बाजारसावंगी, दरेगांव, पाडळी, लोणी बोडखा, कनकशिळ, ताजनापुर येथील नागरिकांना खडतर रस्त्याचा सामना करावा लागत आहे. त्यात गिरीजा नदीवरील धोकादायक पुलामुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे त्वरीत दुरुस्तीचे कामे करण्यात यावी, अशी मागणी गणेश चव्हाण, शेख मकसुद यांनी केली आहे.
फोटो - अशाप्रकारे माटरगांव येथील गिरीजा नदीवरील पुलाची दुरावस्ता झाली असून कठडे नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झालेला आहे.