औरंगाबाद : पैठण लिंक रोडकडून बीड बायपासकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकमधून अॅसिडचा ड्रम खाली पडून फुटल्यानंतर सुमारे एक किलोमीटरपर्यंत अॅसिडचा उग्र वास पसरला. या वासामुळे अॅसिडची वाहतूक करणाºया ट्रकचालकासह अनेकांना चक्कर आणि मळमळीचा त्रास होण्यास सुरुवात झाली.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक पोलिसांनी प्रसंगावधान राखून मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविल्याने पुढील अनर्थ टळला.
वाहतूक शाखेचे निरीक्षक अशोक मुदिराज म्हणाले की, पैठण लिंककडून बीड बायपासकडे एक ट्रक रविवारी दुपारी अॅसिडचे ड्रम घेऊन जात होता. हा ट्रक महानुभाव आश्रम पोलीस चौकीजवळ असताना अॅसिडचा एक ड्रम खाली पडून फुटल्याने त्यातील अॅसिड रस्त्यावर वाहू लागले. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्यांनी ट्रक उभा केला. अॅसिडच्या वासामुळे चालकास चक्कर येऊ लागली आणि मळमळ होत असल्याने तो तेथून लगेच निघून गेला. शिवाय त्याचवेळी रस्त्याने जाणाºया-येणाºया अन्य वाहनचालकांनाही अॅसिडच्या उग्र वासाचा त्रास होऊ लागला.
या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण केले. शहर वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पैठण रोडकडून बायपास आणि शहराकडे येणारी वाहतूक लिंक रोडकडे वळविली, तसेच बायपासकडून लिंक रोडकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविली.
सुमारे चार तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने रस्त्यावर सांडलेले अॅसिड नष्ट केले. यामुळे अॅसिडचा वास कमी झाल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.