छत्रपती संभाजीनगर : विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमासह खासगी समारंभात डोळ्यांना हानिकारक असलेले लेझर लाईट्स, बीम लाईट्सवर शहरात बंदी घालण्यात आली आहे. पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी गुरूवारी याबाबत आदेश जारी करत कोणी त्याचा वापर केल्यास वापरकर्त्यासह मालकावर कठाेर कारवाईचा ईशारा देण्यात आला आहे.
विविध कार्यक्रमांमध्ये अशात लेझर लाईट्स, बीम लाईट्सचा वापर करण्याची क्रेझ आली आहे. मात्र, यामुळे तरुणांसह वृध्दांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम झाल्याने अनेक उदाहरण मुंबई, पुण्यात समोर आली. काही गंभीर प्रकरणात दृष्टी कायमस्वरूपी जाण्याचा धोकाही नेत्रतज्ज्ञांनी व्यक्त केला. शिवाय, अनेक फार्म हाऊस, विवाह समारंभात याच्या वापरामुळे पायलटला विमानाच्या लँडींग व टेकऑफला देखील व्यत्यय येतो. ही बाब लक्षात घेत पवार यांनी पुढिल ६० दिवसांच्या बंदीचे आदेश जारी केले. याचा वापर करणाऱ्यासोबत भाडेतत्वावर देणाऱ्या मुळ मालकावर देखील कारवाई होईल, असे उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी स्पष्ट केले.