वाळूज महानगर : औरंगाबाद-नगर महामार्गावरील दुभाजकावर सुरक्षेसाठी बसविण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या अनेक ठिकाणी तुटल्या आहेत. त्यातच दुभाजकावरून नागरिक रस्ता ओलांडत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. संबंधित प्रशासनाने तात्काळ जाळी दुरुस्तीचे काम हाती घेण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
औरंगाबाद-नगर महामार्गावरील दुभाजकावर पंढरपूर तिरंगा चौक ते कामगार चौक व वाळूज या ठिकाणी वाहनधारक व पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. संबंधित प्रशासनाने देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने जाळीची दुरवस्था झाली आहे. सध्या दुभाजकावरील लोखंडी जाळ्या अनेक ठिकाणी तुटल्या असून, काही ठिकाणी मोडकळीस आल्या आहेत. महामार्गावर जड वाहनासह इतर वाहनांचीही वर्दळ असते.
धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडताना अपघात घडले असून, यात काही जणांचा बळीही गेलेला आहे, तर दुसरीकडे दुभाजक कचराकुंडी बनले आहेत. त्यामुळे महामार्गावरील लोखंडी जाळ्यांची संबंधित प्रशासनाने दुरुस्ती करून धोकादायक मार्ग बंद करावा, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.