औरंगाबाद : शेतकरी आंदोनलामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुधवारी केला होता. दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला असून त्यांनी माफी मागावी या मागणीसाठी प्रहार संघटनेनेचे शिवाजी नगर येथील जलकुंभावर चढून आंदोलन सुरु आहे. संध्याकाळपर्यंत माफी मागितली नाहीतर आत्मदहन करण्याचा आंदोलकांनी दिला आहे.
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा विषय तापला असताना केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी बुधवारी जालना येथे धक्कादायक विधान केलं आहे. "शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचं आंदोलन नाही", असं विधान रावसाहेब दानवे यांनी केलं होते. यानंतर त्यांच्याविरोधात शेतकरी आणि राजकीय स्तरातून टीका सुरु झाली असून त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी होत आहे. गुरुवारी दुपारी प्रहार जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील शिवाजीनगर जलकुंभावर चढून आंदोलन केले. शेतकरी विरोधी विधानाचा निषेध करून आंदोलकांनी दानवे यांनी तत्काळ माफी मागावी अशी मागणी केली आहे. संध्याकाळपर्यंत माफी मागतली नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
दिल्लीत सुरू असलेले आंदोलन सुटाबुटातल्या लोकांचे असून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे अशी भूमिका दानवे यांनी मांडली होती. तसेच "आता जे आंदोलन सुरू आहे ते शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये मुस्लिम समाजाला उचकलं गेलं आणि सीएए, एनआरसीमुळे मुस्लिमांना देशाबाहेर जावं लागेल असं सांगितलं गेलं. पण एखादा तरी मुस्लिम नागरिक बाहेर गेला का?", असं शेतकरी आंदोलनावरुन विधान करून दानवे यांनी आता नव्या वादाला तोंड फोडले आहे.