खुलताबाद: तालुक्यातील वेरूळ येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास जबरी चोरीची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये दानपेटीसह पंचधातूच्या मूर्त्या, चांदीची छत्री असा लाखो रुपयांचा ऐवज चोरठ्यांनी लंपास केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असून घटना स्थळी फिंगरप्रिंट पथक व श्वानपथक पाचारण करण्यात आले होते.
याबाबत पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, गुरुवार दिनांक १७ ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास ही चोरीची घडली असून या घटनेमध्ये पार्श्वनाथ भगवान यांच्या विविध भावमुद्रेतील सात मूर्ती व दहा किलोचे चांदीची छत्री हे चोरट्यांनी चोरून नेले असल्याची माहिती पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष दिनेश गंगवाल यांनी दिली. या चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी विजयकुमार ठाकूरवाडी, खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजयफराटे, पोलीस उपनिरीक्षक बनसोडे यांच्यासह फिंगरप्रिंट पथक व डॉग पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपास सुरू केला आहे.
मध्यरात्री झाली चोरीवेरूळ येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदीरात भगवंताच्या मूर्ती, चांदीच्या छत्री आणि दानपेटी चोरीला गेली आहेत. मध्यरात्री दोन वाजेच्या आसपास ही चोरी झाली. पुजारी जेव्हा मंदिरात साफसफाई करण्यासाठी आले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, मंदिरात चोरी झाली. ही माहिती त्यांनी तत्काळ मॅनेजर आणि मंदिराच्या पदाधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच आम्ही मंदिरात येऊन पाहणी करून चोरीची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज देखील घेतले असून पोलीस विभाग तपास करत असल्याची माहिती पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष दिनेश गंगवाल यांनी दिली.
चोरटे सीसीटीव्हीत कैदमंदिर व्यवस्थापन समितीने दिलेल्या माहितीनुसार मंदिर परिसरात सुरक्षारक्षक रात्रीची गस्त घालण्यासाठी ठेवण्यात आले होते. तसेच मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे ही बसवण्यात आले होते. मात्र, अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या पाठीमागील बाजूने असलेल्या दरवाज्याचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करून ही धाडसी चोरी केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन चोरटे दिसून आले असून त्यांनी तोंडाला बांधलेल्या मास्कमूळे चेहरा स्पष्ट दिसत नसल्याचेही समोर आले आहे. दरम्यान गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.