खुलताबाद : सिंचन विहिर मंजूर करण्यासाठी लाभार्थ्याकडून १० हजाराची लाच घेताना दरेगाव येथील सरपंचाच्या पतीस लाचलुचपत प्रतिबंध पथकाने रंगेहाथ पकडले. खुलताबाद पं.स.च्या परिसरातील एका हॉटेलात बुधवारी ४ वाजेच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खुलताबाद तालुक्यातील दरेगाव येथील ग्रामपंचायतीत सन 2021 मध्ये मग्रारोहयो अंतर्गत सिंचन विहिरिचा लाभ मिळावा म्हणून तक्रारदार यांनी प्रस्ताव दाखल केला. ग्रामपंचायतीत त्यासंदर्भात विहिरीचा ठराव घेवून मंजूरी द्यावी तसेच ठराव पंचायत समितीकडे पाठवावा यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच जयश्री बोर्डे यांचे पती गणेश रामू बोर्डे यांनी लाचेची मागणी केली. त्याने या कामासाठी वीस हजार रूपयांची मागणी करत तडजोडीअंती १० हजार रूपयात हा व्यवहार ठरला.
पंरतू, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभाग औरंगाबाद यांच्याकडे तक्रार दिली. बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास खुलताबाद पंचायत समितीच्या मुख्यप्रवेशद्वारा शेजारील एका हॉटेलात गणेश रामू बोर्डे यास १० हजार रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरु आहे. ही कारवाई लाचलुचपत पथकाचे पोना प्रकाश भगुरे, रवींद्र देशमुख, मिलींद इपर,कपील गाडेकर,चंद्रकांत शिंदे यांनी केली.