लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वीज बिलाच्या थकबाकीपोटी शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. त्यामुळे शहरातील पथदिवे गत सहा वर्षांपासून बंद आहेत. वीज बिल भरण्यासाठी पालिकेने आतापर्यंत केलेले तडजोडीचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले असून परिणामी यंदाच्या गणेशोत्सवातही शहरातील रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य आहे.गणेशोत्सव काळात तरी शहरातील पथदिवे पालिकेने सुरू करावेत, अशी मागणी सर्वस्तरातून करण्यात आली होती. पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही या विषयावर वादळी चर्चा झाली. तात्पुरत्या स्वरुपात जोडणी घेऊन पथदिवे सुरू करावे, अशा सूचनाही काही सदस्यांनी केल्या. मात्र, पालिकेच्या विद्युत विभागाने कुठलेच नियोजन केले नाही.शहरातील विविध रस्त्यांवर पालिकेचे सुमारे १२ हजार पथदिवे आहेत. या पथदिव्यांच्या वीज बिलाचा अनेक वर्षांपासून नियमित भरणा करण्यात आलेला नाही. त्यामुळे महावितरणाची नगरपालिकेकडे मुद्दल व व्याज मिळून दहा कोटींवर थकबाकी आहे. थकबाकीपोटी शहरातील सर्व पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील बसस्थानक, मामा चौक, कादराबाद, बडीसडक, जिजामाता प्रवेशद्वार या मुख्य रस्त्यांवरील पथदिवे बंद आहेत. जुना जालना भागातील मस्तगड ते गांधीचमन, रेल्वेस्टेशन रोड, कचेरी रोड, उड्डाण पूल या भागातील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी मुख्य रस्ते आणि मुख्य चौकांमध्ये रात्री अंधार असतो. शहरातील अंतर्गत भागातील पथदिवे बंद असल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे.सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. गणेशदर्शनासह देखावे पाहण्यासाठी भाविकांचा रात्री उशिरापर्यंत रस्त्यांवर वावर असतो. परंतु, अंधारमय रस्त्यावरून जाताना भाविकांची गैरसोय होत आहे. महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे.या विषयी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना विचारले असता, विसर्जन मिरवणूक रस्ता व विसर्जनाच्या दिवशी मोती तलाव चौपाटीवरील पथदिवे सुरू करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवातही अंधाराचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:38 AM