औरंगाबाद : ऑगस्ट महिना लागला तरीही मराठवाड्यावरील दुष्काळाचे मळभ अजून हटेना. अजूनही दुष्काळाच्या विळख्यातच विभाग अडकलेला आहे. कमी पावसामुळे खरीप हंगामात १६ ते १८ टक्क्यांनी पेरा कमी झाला आहे. ८२ हजार जनावरे चारा छावण्यांत आहेत, तर विभागातील सर्व ८७२ पैकी बहुतांश प्रकल्पांत अजूनही जोत्याच्या वर पाणी आलेले नाही.
विभागाची वार्षिक सरासरी ७७९ मि.मी. आहे. ४४३ मि.मी. पाऊस आजवर होणे अपेक्षित होते. २६२.८२ मि.मी. इतका पाऊस विभागात आजवर झालेला आहे. १८१ मि.मी. पावसाची विभागात तूट आहे. १ आॅगस्ट ते २ आॅगस्टच्या सकाळी ८ वाजेपर्यंत विभागात ३.३० मि.मी. पाऊस झाला आहे. सद्य:स्थितीत विभागातील लहान-मोठ्या ८७२ प्रकल्पांत १.२५ टक्क्याच्या आसपास पाणीसाठा असून, सर्व प्रकल्पांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. पाऊस लांबल्यामुळे खरिपाच्या ८४ टक्केच पेरण्या झालेल्या आहेत. बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत चारा छावण्या अजूनही सुरूच आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ७० चारा छावण्या सुरू असून, एकूण ५५ हजार ९७५ जनावरे तेथे आहेत, तर बीड जिल्ह्यात ३९ चारा छावण्यांत एकूण २५ हजार ९८८ जनावरे आहेत. विभागात २ हजारांच्या आसपास टँकर सुरू आहेत. मराठवाडा विभागात ११ मोठ्या प्रकल्पात ०.५२ टक्का पाणी आहे. ७५ मध्यम प्रकल्पात ३ टक्के, ७४९ लघु प्रकल्पात दीड टक्का, गोदावरील बंधाऱ्यात ०.१५ टक्का पाणी आहे. जायकवाडी धरण मृतसाठ्यातून फक्त वर आले आहे. सध्या एवढीच काय ती समाधानाची बाब आहे. दरम्यान, विभागीय प्रशासनाने मराठवाड्यातील पेरण्या, पाणीपुरवठा योजनांबाबत आढावा घेण्यास सुरुवात केली असून, आयुक्त सुनील केंद्रेकर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वस्तुस्थितीचा माहिती घेत आहेत.