औरंगाबाद : औरंगाबादेतील नातेवाइकाच्या लग्नसमारंभासाठी लंडनहून मुंबईत दाखल झालेल्या एनआरआय (NRI ) कुटुंबातील २१ वर्षीय मुलगी रविवारी ओमायक्राॅन बाधित ( Omicron Variant) आढळली. तेथे अहवाल निगेटिव्ह आल्याने आधी आई, बहीण आणि वडील असे तिघेही औरंगाबादेत दाखल झाले. मात्र, येथे तपासणीअंती ओमायक्राॅन बाधित मुलीचे ५० वर्षीय वडील काेरोनाबाधित ( Corona Virus ) आढळल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. आता ते ओमायक्राॅन बाधित आहेत की नाही, याचे निदान होण्यासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला स्वॅब नमुना पाठविण्यात येणार आहे.
परदेशातून आलेल्या शहरातील एका नागरिकास मुंबई विमानतळावरील तपासणीतून ओमायक्राॅनची बाधा झाल्याचे रविवारी समोर आले. यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने युद्धपातळीवर यासंदर्भात खबरदारीचे पाऊल उचलले. शहरातील नातेवाइकाच्या मुलीच्या लग्नसमारंभासाठी लंडनमध्ये राहणारे पती, पत्नी आणि दोन मुली, असे कुटुंब १४ डिसेंबर रोजी मुंबई विमानतळावर आले. तेथे त्यांनी औरंगाबादचा पत्ता नमूद केला. तपासणीअंती २१ वर्षीय मुलगी कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले, तर अन्य तिघेही निगेटिव्ह असल्याचे निदान झाले. ओमायक्राॅन बाधित मुलीचे वडील काळजी घेण्यासाठी मुंबईतच थांबले, तर तिची आई आणि बहीण शहरात दाखल झाले. आई आणि बहीण शहरातील एका हाॅटेलमध्ये थांबले.दरम्यान, बाधित मुलीच्या वडिलांनी औरंगाबादेत खासगी लॅबमध्ये तपासणी केली. तिचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. ही माहिती मिळताच महापालिकेने सोमवारी सकाळी त्यांचा पुन्हा स्वॅब घेऊन घाटीत तपासणीसाठी पाठविला. सायंकाळी हा अहवालही पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे ओमायक्राॅन बाधित मुलीच्या वडिलांना उपचारासाठी मेल्ट्राॅनमध्ये दाखल करण्यात आले.
आई, बहीण निगेटिव्हलंडनहून निघताना या चारही जणांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह होता. शिवाय, त्यांचे लसीकरण झालेले आहे. आता एक मुलगी ओमायक्राॅन बाधित आहे, तर वडील काेरोना पाॅझिटिव्ह आहेत. मुंबई विमानतळावरील तपासणीत आई, बहिणीचा अहवाल निगेटिव्ह आला. औरंगाबादेतील तपासणीतही या दोघींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांना मेल्ट्राॅनमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.
हाॅटेलमध्ये खळबळ, २१ जणांचे घेतले स्वॅबओमायक्राॅन बाधित मुलीचे आई-वडील आणि बहीण औरंगाबादच्या एका हाॅटेलमध्ये क्वारंटाईन होते. या हाॅटेलमधील २१ कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
कुटुंब जागरूक, लग्नसमारंभ टाळलामुलगी कोरोनाबाधित आढळल्याने शहरात दाखल झाल्यानंतरही जागरूक राहून आई आणि बहिणीने लग्नसमारंभास जाणे टाळले. वडिलांनीही शहरात आल्यानंतर नातेवाइकांपासून दूर राहणे पसंत केले.
प्रवास केलेल्या वाहनचालकाचा शोधमुंबईहून औरंगाबादला येण्यासाठी या कुटुंबाने ज्या वाहनाचा वापर केला, आता त्या वाहनाच्या चालकाचा महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शोध घेतला जाणार आहे.
७ दिवसांत येणार जिमाेन सिक्वेन्सिंगकोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णाचा आगामी सात दिवसांत जिनोमिक सिक्वेन्सिंगचा अहवाल प्राप्त होऊ शकतो. त्यातून हा रुग्ण ओमायक्राॅनबाधित आहे की नाही, हे स्पष्ट होईल. निगेटिव्ह आलेल्या आई आणि बहिणीची पुन्हा एकदा कोरोना चाचणी केली जाईल. महापालिकेकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.- डाॅ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा