- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : ‘विजेचा वापर करताना योग्य काळजी घ्या आणि अपघात टाळा’ अशी जनजागृती करणाऱ्या महावितरणच्या दिव्याखालीच अंधार आहे. कारण जागोजागी चिकटपट्ट्या गुंडाळलेल्या केबल्ससह ‘शॉक’ देण्यासाठी सज्ज असलेल्या उघड्या वायर्स, लटकणारे स्वीच बोर्ड, ट्युबलाईट, तुटलेल्या स्वीच बोर्डमधून डोकावणाऱ्या वायर्स, ही स्थिती महावितरणच्या कार्यालयांचीच आहे. जिल्ह्यामध्ये महावितरणच्या कार्यालयांनाच विजेचे धक्के बसण्याची वेळ ओढवली आहे.
अन्न, वस्त्र, निवाऱ्याइतकीच वीजही आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. तिचा जर योग्य वापर झाला नाही, तर अपघाताला आमंत्रण मिळालेच म्हणून समजा. वीजपुरवठ्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या महावितरणचेच याकडे काहीसे दुर्लक्ष होत आहे. भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात काही दिवसांपूर्वी घडलेल्या अपघातानंतर सर्व रुग्णालयांचे फायर आणि इलेक्ट्रिक ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले. या पार्श्वभूमीवर महावितरणच्या कार्यालयांतील विद्युत यंत्रणेच्या अवस्थेची ‘लोकमत’ने पाहणी केली. या पाहणीत महावितरणच्या कार्यालयांतच अपघाताला आमंत्रण देणारी अवस्था पाहायला मिळाली. छोटासा स्पार्कही धोकादायक ठरू शकतो. परंतु विद्युत यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीकडे महावितरण प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठ अधिकारी ज्या कार्यालयांत बसतात, ती मात्र सुसज्ज करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक ऑडिट कोणत्या कार्यालयाचे करायचे, यापूर्वी ते कधी झाले, याची अद्ययावत माहिती महावितरच्या अधिकाऱ्यांकडे नाही. ती घेतली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सूचना करतोकोणत्या कार्यालयास, किती कार्पेट एरियाला इलेक्ट्रिक ऑडिट गरजेचे, याची माहिती घेतली जाईल. कोणत्या इमारतीला हे लागू आहे, हे आधी पाहावे लागेल. जेव्हा जेव्हा मी कार्यालयांना भेट देतो, तेव्हा तात्काळ त्यासंदर्भात सूचना करतो. बहुतांश ठिकाणी चांगली स्थिती आहे. यापुढेही त्याचा आढावा घेतला जाईल.- भुजंग खंदारे, मुख्य अभियंता, महावितरण
ग्रामीण विभाग कार्यालय, चिकलठाणाइमारतीत प्रवेश करतानाच लटकलेला विद्युत बोर्ड, ट्युबलाईट, जुनाट वायरिंग, लोंबकळत आणि जागोजागी चिकटपट्ट्या गुंडाळलेले वायरिंग निदर्शनास पडते. इमारतीची एक-एक पायरी चढताना विद्युत यंत्रणेची अवस्था पाहून अधिकारी-कर्मचाऱ्यांना दररोज मनोमन ‘शॉक’ बसत आहे. कार्यालयातही ठिकठिकाणी वायर्सचे गुच्छे लोंबकळत आहेत.
अधीक्षक अभियंता (स्था) कार्यालय, दूध डेअरी चौकया इमारतीत इतर कार्यालये, वीज बिल भरणा केंद्रही आहे. अभियंत्याच्या कक्षासमोरच दुरवस्था झालेला स्वीच बोर्ड आहे. स्वीच बोर्डमधील विद्युत वायर बाहेर पडल्या आहेत. उघड्या स्वरूपातील वायरला चिकटपट्टी लावण्याचीही कोणी तसदी घेतली नाही. त्यातून कोणालाही विजेचा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहर उपविभाग कार्यालय, चिकलठाणाइमारतीत प्रवेश करताच अधिकाऱ्यांची नावे असलेल्या फलकावरच चिकटपट्टीची ठिगळपट्टी करून अनेक वायर एकत्र केल्याचे निदर्शनास पडते. कार्यालयात काही ठिकाणी विद्युत वायर्स लोंबळकत आहेत. इमारतीच्या बाहेरून जागोजागी वायर्स आणि लोखंडी खिडकीला स्वीच लटकलेला पाहायला मिळतो.
जिल्ह्यात महावितरणची कार्यालये- १३१महावितरणचे अधिकारी-कर्मचारी- २२७७कार्यालयांचा रियालिटी चेक- ६