औरंगाबाद : वानरांपासून माणसाच्या उत्क्रांतीचा डार्विन यांनी मांडलेला आणि सध्या जगन्मान्य असलेला मानवाच्या उत्क्रांतीचा सिध्दांत खोटा असल्याचे नवेच संशोधन मोदी सरकारमधील केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपालसिंह यांनी केले आहे. अखिल भारतीय वैदिक संमेलनाच्या उद्घाटनासाठी ते शुक्रवारी औरंगाबादेत आले होते.
मुंबईचे पोलीस आयुक्त राहिलेल्या डॉ. सिंग यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना अनेक विचित्र विधाने केली. वानरापासून मनुष्याची निर्मिती झाली आहे, असे कुणी पाहिले आहे काय चमत्कारिक प्रश्नच त्यांनी विचारला. आपल्या पूर्वजांपासून ते आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टींमध्ये किंवा पुस्तकांमध्ये वानरापासून मानवाची निर्मिती झाली असे कुणीच म्हणालेले नाही. कुणी मनुष्य जंगलात गेला व त्याने तिथे वानरापासून मनुष्याची निर्मिती झाली आहे, असे कोणी पाहिले आहे काय, तसा दावाही कुणी केलेला नाही. मात्र, आम्हाला शालेय, महाविद्यालयीन अभ्यासक्रमात डर्विंन या शास्त्रज्ञाचा तोे सिद्धांत शिकविला जातो. डार्विनचा विज्ञानातील हा सिद्धांत खोटा आणि अत्यंत चुकीचा आहे. माणसाची उत्क्रांती वानरांपासून झाली नाही, हे आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी विदेशात ३५ वर्षापूर्वीच सिध्द केल्याचा दावाही डॉ. सिंग यांनी केला. त्यापुढे जाऊन सिंग म्हणाले की, शाळा, महाविद्यालयातील अभ्यासक्रमातून डार्विनचा सिद्धांत काढून टाकावा. पृथ्वीवर सुरुवातीपासून मनुष्य आहे व मनुष्य म्हणूनच तो राहणार आहे. यापुढे अभ्यासक्रमांतही असेच शिकविले गेले पाहिजे.
त्यांच्या मुलांना जंगलात नेऊन सोडा-सत्यपाल सिंह यांचे आणखी एक गमतीशीर विधान यावेळी केले. ते म्हणाले, ‘काही शास्त्रज्ञ असे म्हणतात की, पशू,पक्षी आणि जनावरांचा आवाज ऐकून मनुष्य भाषा बोलण्यास शिकला. मी म्हणतो की, असे बोलणार्यांच्या मुलांना काही वर्ष जंगलात नेऊन सोडा. बघू, तेथील पशू,पक्ष्यांच्या आवाजावरुन ते कोणती भाषा शिकतात ते’. सूर्य, पृथ्वी, चंद्राच्या निर्मितीनंतर भगवंतांनी वेदवाणी केली व जगातला मुनष्य तेच वेद पहिले शिकला, असेही ते बोलून गेले. इश्वराच्या ज्ञानरुपी गंगेतून मनुष्य वेद म्हणण्यास शिकला. हे सत्य आहे, असा दावा त्यांनी केला.
पाहा व्हिडीओ -