लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सायंकाळी कर्णपुºयात जनसागर उसळला होता. लाखो भाविकांमधून वाट काढीत बालाजी भगवंतांचा रथ पुढे सरकत होता. ‘गोविंदा, गोविंदा’ असा नामोच्चार करीत शेकडो युवक रथ ओढत होते. ही रथयात्रा पंचवटी चौकात आली तेव्हा फटाक्यांची आतषबाजी व आरती करण्यात आली. या रथोत्सवासोबत शहरवासीयांनी सीमोल्लंघन करून विजयादशमी साजरी केली. तत्पूर्वी सकाळी राजाबाजार येथील मंदिरातून बालाजीचा रथ तर सायंकाळी चौराहा येथून बालाजीची पालखी काढण्यात आली होती. येथेही भगवंतांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.कर्णपुरा यात्रेत विजयादशमीच्या दिवशी बालाजी भगवंतांचा रथोत्सव साजरा करण्याची जुनी परंपरा आहे. शनिवारीही लाखो भाविकांनी या रथोत्सवात सहभागी होऊन मंदिराबाहेर भगवंतांचे दर्शन घेतले. सायंकाळी ६.०० ते ६.३० वाजेच्या सुमारास विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पोलीस आयुक्त यशस्वी यादव, मनपा सभापती गजानन बारवाल, नगरसेवक नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते बालाजी भगवंतांची आरती करण्यात आली. त्यानंतर ‘गोविंदा-गोविंदा’ नामोच्चार करीत सागवानी लाकडाच्या रथात बालाजीची मूर्ती ठेवण्यात आली. रथाच्या दोन्ही बाजूला लांब दोरखंड लावण्यात आले होते. पदमपुरा परिसरातील २५० पेक्षा अधिक युवक दोरखंड हातात धरून रथ ओढत होते. २३ फूट उंच रथ असल्याने लाखोंची गर्दी असतानाही प्रत्येक भाविकाला दूरवरूनही भगवंतांचे दर्शन घडत होते. भगवंतांचा रथ जसजसा पंचवटी चौकाकडे येऊ लागला तेव्हा आजूबाजूला उंच आकाशपाळणे व मध्ये रथ हे दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे ठरले. हे दृश्य पाहण्यासाठी शेकडो लोक महावीर उड्डाणपुलावर जाऊन उभे राहिले होते. बालाजीचा रथ पंचवटी चौकात आल्यावर आरती करून पुन्हा रथ मंदिराच्या दिशेने वळविण्यात आला.
बालाजीच्या रथासोबत झाले सीमोल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 12:40 AM