फुलंब्री तालुक्यात ही घटना ७ एप्रिल २०२० राेजी घडली होती. कोराेनाच्या पार्श्वभूमीवर लागू टाळेबंदीमुळे पीडितेचा पिता घरीच हाेता. आई शेतीकामाला गेल्यानंतर पिता पीडितेशी लगट करायचा. रात्रीही जवळ येऊन स्पर्श करायचा. त्याची माहिती आईला दिल्यानंतर पित्याने पीडितेसह तिच्या आईला चाकू दाखवून धमकी दिली व घरातून निघून गेला.
या संदर्भातील तक्रार दाखल झाल्यानंतर फुलंब्रीचे पाेलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी दाेषाराेपपत्र दाखल केले. विशेष जिल्हा सरकारी वकील सुदेश सिरसाठ यांनी ५ साक्षीदारांचे जबाब नाेंदविले. फिर्यादी, तिची आई व मुख्याध्यापक यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने आराेपीला भादंवि कलम ३५४ (अ) अन्वये ३ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंड, पाेक्साे कलम ८ खाली ५ वर्षे सक्तमजुरी, ५ हजार दंड, पाेक्साे कलम १२ प्रमाणे ३ वर्षे सक्तमजुरी, ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा व एकूण १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.