दौलताबाद : येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या डोंगरावरील गवताला गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आग लागली असून रात्री उशिरापर्यंत ही आग आटोक्यात आली नव्हती.
ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्याच्या डोंगरावर असलेल्या बारादरी परिसरातील गवताला गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आग लागली. बघता बघता आगीने पूर्ण बारादरी परिसराला वेढले. हे दृश्य पाहून दौलताबाद पोलिस ठाण्याचे कर्मचारी शरद बचवा, किल्ला कर्मचारी कृष्णा दळवी, रमेश राठोड, आसाराम काळे, सीताराम धनाईत, रमेश राठोड, उत्तम जाधव, फकिरचंद गायकवाड आदींनी तेथे असलेल्या पर्यटकांना सुखरूप किल्ल्याखाली आणले. तसेच बारादरी परिसर खाली केला. बघता बघता ही आग पुढे रासाईमाता डोंगरावरापर्यंत गेली. डोंगर परिसर मोठा असल्याने उपस्थित किल्ला कर्मचारी व अन्य नागरिक काहीही करू शकले नाहीत. रात्री उशिरापर्यंत ही आग सुरूच होती. याबाबत दौलताबाद किल्ल्याचे सहायक संरक्षक आर.बी. रोहनकर म्हणाले, ही आग ज्या ठिकाणी लागली त्या ठिकाणापर्यंत जाऊ शकत नसल्याने आम्ही काहीच करून शकत नसल्याचे ते म्हणाले. एखाद्या पर्यटकाने विडी, सिगारेट ओढून तशीच फेकून दिली असेल. त्यातून आग लागली असावी, असे ते म्हणाले.
मोर, सरपटणारे प्राणी आदींना फटकाकिल्ला डोंगरावर असलेली मोठी जुनी झाडे, मोरांचे घरटे, साप, विविध प्रकारच्या पक्ष्यांची घरटी, सरपटणारे प्राणी यांना या आगीचा मोठा फटका बसल्याची चर्चा आहे. अनेक वेळा डोंगर व किल्ला परिसरात उन्हाळ्यात एप्रिल किंवा मे महिन्यात आग लागते. यावर्षी नोव्हेंबर महिन्यातच आग लागल्याने पर्यावरणप्रेमी अस्वस्थ झाले आहेत.