छत्रपती संभाजीनगर : दौलताबाद किल्ल्यासमोरील ऐतिहासिक तटबंदी सुरक्षित ठेवून, त्या मार्गावर होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्याची कालमर्यादा खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी घालून दिली आहे. पुढील सुनावणी ८ सप्टेंबरला होईल.
नवीन पर्यायानुसार ६० टक्के जागा शासनाची असून ४० टक्के जागेचे अधिग्रहण करावे लागणार आहे. २०२३-२४ चा वार्षिक आराखडा ४५ दिवसांत सादर करावा. पुढील ३० दिवसांत ‘डीपीआर’ व त्यानंतरच्या १२० दिवसांत अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करावी. अधिग्रहणानंतर ४५ दिवसांत निविदा प्रक्रिया पूर्ण करावी आणि २७० दिवसांत रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी कालमर्यादा खंडपीठाने घालून दिली. नवीन पर्यायी मार्ग तयार झाल्यानंतर दौलताबाद किल्ल्याच्या उत्तरेकडे उघडणारा दिल्ली दरवाजा कायमचा बंद करावा, असेही आदेशात म्हटले आहे.
वाहतूक कोंडी रोखण्यासाठी किल्ल्याच्या पूर्वेकडून शासनाच्या १.५ कि. मी. जमिनीतून जाणारा अब्दीमंडी ते दौलताबाद घाटापर्यंत ३.५ कि. मी.चा पर्यायी रस्ता तयार करणे हा तांत्रिक आणि आर्थिक दृष्टीने व्यवहार्य पर्याय असल्याचे शपथपत्र राष्ट्रीय महामार्ग विभागाने यापूर्वीच्या सुनावणीवेळी खंडपीठात सादर केले होते.वरील पर्यायी मार्गामुळे ऐतिहासिक वारसा स्थळाचे जतन होणार आहे.
शहरातील नागरिकांसह देश- विदेशातील पर्यटकांना वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर, भद्रा मारोती, खुलताबाद येथील जरजरी जर बक्ष दर्गा, मालोजीराजे भोसले यांची गढी तसेच मराठवाड्याचे महाबळेश्वर असलेल्या म्हैसमाळ या थंड हवेच्या ठिकाणाकडे विनाअडथळा जाता येईल. याचिकेत ‘अमायकस क्युरी’ म्हणून ॲड. नेहा कांबळे, राज्य शासनातर्फे सरकारी वकील ज्ञानेश्वर काळे, केंद्रातर्फे ॲड. बी. बी. कुलकर्णी यांनी काम पाहिले.