दावरवाडी : गावातील नागरिकांची आता पाण्याची प्रतीक्षा संपली आहे. गेल्या आठ वर्षांपासून रखडलेल्या जलकुंभाचे काम पूर्ण झाले असून, त्याचे लोकार्पण रविवारी झाले. आता दावरवाडीत सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे. त्याचबरोबर दावरवाडी ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचेदेखील लोकार्पण झाले. मंत्री संदीपान भुमरे यांच्या प्रयत्नांतून झालेल्या कामाने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
भारत निर्माण योजना व चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीअंतर्गत दावरवाडी गावात नवीन जलकुंभाचे काम आठ वर्षांपूर्वी मंजूर झाले. त्यामुळे गावात शुद्धपेयजल मिळणार, अशी आशा गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली. मात्र, मागील दोन ते तीन वर्षांपासून हे काम संथगतीने सुरू होते. मंत्री संदीपान भुमरे यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्यानंतर कामाला गती मिळाली. त्याचबरोबर दावरवाडी- डेरा ग्रुप ग्रामपंचायतीची नवीन इमारतीचे कामदेखील पूर्ण झाले आहे.
जलकुंभ व ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचे लोकार्पण रविवारी (दि.१८) जि.प. माजी बांधकाम सभापती विलास भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य कमलाकर एडके, सरपंच श्याम तांगडे, उपसरपंच राजेंद्र वाघमोडे, ग्रामविकास अधिकारी ए.बी. काकडे, अरविंद तांगडे, ॲड. डी.डी. जाधव, कोंडिराम वाघमोडे, नानासाहेब एडके, माजी सरपंच उत्तमराव खांडे, प्रकाश देशमुख, गोपाल धारे, प्रशांत देशमुख, प्रवीण खांडे, राजेंद्र नन्नवरे, इम्रान शेख, नाथाजी सोरमारे आदींची उपस्थिती होती.
फोटो :
दावरवाडी ग्रामपंचायतीच्या इमारतीचे लोकार्पण माजी सभापती विलास भुमरे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य.