लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी ‘डे केअर सेंटर’चे उद््घाटन झाले. मराठवाड्यातील हे पहिले सेंटर ठरले असून, हिमोफिलिया, सिकलसेल आणि थॅलेसीमियाच्या रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे.‘डे केअर सेंटर’च्या माध्यमातून रुग्णसेवेत भर पडली आहे. शहरात खाजगी रुग्णालयांत हे सेंटर आहे; परंतु मराठवाड्यात आरोग्य विभागाच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील हे पहिलेच सेंटर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. उद््घाटनप्रसंगी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, आ. अतुल सावे, आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, डॉ. जी. एम. गायकवाड यांची उपस्थिती होती. मराठवाड्यातील विविध ठिकाणांहून रुग्णही आले होते. या सेंटरबरोबरच ३१ आॅगस्ट रोजी राज्यातील हिमोफिलिया, थॅलेसीमिया रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधी खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही रुग्णांना आवश्यक असणारी औषधी खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सद्य:स्थितीतील औषधी तुटवडा दूर होण्यास मदत होणार आहे.
सामान्य रुग्णालयात ‘डे केअर सेंटर’ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 1:02 AM